जालन्यात उद्यापासून क्षयरुग्णांची शोधमोहीम | पुढारी

जालन्यात उद्यापासून क्षयरुग्णांची शोधमोहीम

जालना, पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी ८ ते १२ मार्च दरम्यान शोधमोहीम राबणार आहे. या शोधमोहिमेसाठी ११७ पथकांची स्थापना करण्यात आली असून, यांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील २ लाख ३६ हजार ७१२ लोकांच्या सर्व्हेद्वारे क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येईल.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अतिजोखमीच्या घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी ११७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात २३४ आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय २३ पर्ववेक्षकांद्वारे पर्यवेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार ७१२ लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. निदान न झालेले क्षय रूग्ण तसेच नवीन सांसर्गिक रुग्ण या मोहिमेंतर्गत शोधून काढणार आहे. याकरिता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक, विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना चमूंमध्ये सहभागी केले आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करून घराच्या दरवाजावर खूण करणे, क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेणे, गरजेनुसार छातीचा एक्स-रे घेणे, तपासणी करणे आदी कामे करणार आहेत. या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या संदिग्ध रुग्णांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप यांनी दिली आहे.

Back to top button