औरंगाबाद : नाव मेट्रो, धावणार बसच; काय आहे मेट्रो नियो? | पुढारी

औरंगाबाद : नाव मेट्रो, धावणार बसच; काय आहे मेट्रो नियो?

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  औरंगाबादेत नियो मेट्रो : चालविण्यासाठी महामेट्रो कंपनीकडून दोनवेळा सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते रेल्वेस्टेशन मार्गावर नियो मेट्रो चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, नाव मेट्रो असले तरीदेखील ही एकप्रकारे मोठ्या आकाराची बसच असणार आहे. ती रेल्वेप्रमाणे रुळावरून धावणार नाही, तर बससारखीच रबर टायरवर धावेल. तिची लांबी १८ मीटर आणि प्रवासीक्षमता १७० इतकी असणार आहे.

मुंबई, पुण्याप्रमाणे औरंगाबादेतही मेट्रो रेल्वे सुरू करण्याची सूचना तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी वर्षभरापूर्वी प्रशासनाला केली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही त्यात पाठपुरावा केला. त्यानुसार स्मार्ट सिटीने मेट्रो रेल्वेचा डीपीआर बनविण्यासाठी महामेट्रो कंपनीची नियुक्ती केली. मेट्रो बनविण्याआधी शहराचा कॉम्प्रहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन (सीएमपी) म्हणजेच सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करावा लागतो. त्यातून शहरातील वाहतूक, वाहनांची संख्या, मेट्रो सुरू करण्यासाठी योग्य मार्ग, त्यातील अडथळे, मेट्रोची फिजिबिलिटी आदींची माहिती गोळा केली जाते. प्रशासनाने सुरुवातीला शेंद्रा ते वाळूज आणि रेल्- वेस्टेशन ते मुकुंदवाडी व्हाया हर्सल टी पॉइंट हे दोन मार्ग सुचविले होते. यात शेंद्रा ते वाळूज या दरम्यान जालना रोडवर अखंड उड्डाणपूल उभारण्यात यावा आणि त्यावर मेट्रो चालविली जावी अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महामेट्रोने गतिशीलता आराखडा आणि मेट्रोचा मार्ग याबाबतचा आराखडा तयार करून त्याचे दोनवेळा सादरीकरण केले आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते क्रांती चौक मार्गे रेल्वेस्टेशन मार्ग निवडण्यात आला आहे. या मार्गावर नियो मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे.

काय आहे मेट्रो नियो ?

मेट्रो नियो ही मेट्रो रेल्वे आणि बस यांचे हायब्रीड व्हर्जन आहे. ती १८ मीटर लांब आणि १७० आसन क्षमतेची असते. मेट्रो नियोसाठी रुळांची गरज नाही. तिला रबर टायर असल्याने ती रस्त्यावरूनच धावते. सुरुवातीला जालना रोडवर अखंड उड्डाणपूल आणि दोन मार्गांवरील मेट्रो नियो अशा एकत्रित प्रकल्पाचा खर्च सुमारे ६२७८ कोटी रुपये एवढा असेल, असे महामेट्रोने म्हटले होते. मात्र, आता मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रो नियोचा खर्च सुधारित डीपीआरमध्ये मांडला जाणार आहे. अखंड उड्डाणपुलासाठीच साडेतीन हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे.

औरंगाबादसाठी मेट्रो नियो का ?

औरंगाबादेत मेट्रो रेल्वेऐवजी मेट्रो नियोचा पर्याय का निवडण्यात आला याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. महामेट्रो कंपनीने कॉम्प्रहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये २०५२ सालची अपेक्षित लोकसंख्या आणि त्यावेळची वाहतूक याची आकडेवारी जमविली आहे. प्रस्तावित मार्गावर प्रति तास ८ हजार पेक्षा जास्त वाहनांची ये-जा असेल तर मेट्रोचा पर्याय दिला जातो. इथे तुलनेने कमी वाहतूक असणार आहे. म्हणून मेट्रो नियोचा पर्याय निवडण्यात आला आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो नियो विजेवर धावते

निओ मेट्रो ही टीअर २ आणि टीअर ३ शहरांसाठी कमी खर्चाची, ऊर्जा कार्यक्षम आणि इको-फ्रेंडली वाहतूक सेवा आहे. या बसला खाली रुळाऐवजी टायर जरी असले तरी ही मेट्रोही विजेवरच धावते. त्यासाठी इलेक्ट्रिक रेल्वेप्रमाणे ओव्हरहेड वायर टाकले जातात. मेट्रो नियोची वेगमर्यादा ताशी ९० किमी एवढी आहे, | सार्वजनिक बसपेक्षा तिची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता तीन ते पाच पट अधिक आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Back to top button