लातूर जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का, नव्या उमेदवारांना संधी; पहा तालुक्यानुसार निकाल | पुढारी

लातूर जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का, नव्या उमेदवारांना संधी; पहा तालुक्यानुसार निकाल

लातूर; पुढारी वृतसेवा : जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत बऱ्याच गावात प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे. भाजप व काँग्रेस समर्थकांची आघाडी असून औसा तालुक्यात अखिल भारतीय छावा संघटनेच्या ताब्यात एक ग्रामपंचात गेली आहे. भाजप व काँग्रेस पक्षाचे नेते आपल्याच पक्षाचे अधिक प्राबल्य असल्याचे सांगत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड यांनी ३५१ पैकी २३८ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आल्याची माहिती दिली आहे.

रेणापूर तालुक्यात झालेल्या ३३ ग्रामपंचायतीपैकी १८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे, १० भाजप तर ३ ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना अशी सरपंच पदाची सत्ता राहिली आहे. उर्वरीत निकालाचा कौल संमिश्र आहे.

औसा तालुक्यात ५८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपचा वरचष्मा राहीला असून तावशी ताड ग्रामपंचायतीवर अखिल भारतीय छावा संघटनेची सत्ता आली आहे. याशिवाय शिवसेना-ठाकरे गट, मनसे समर्थकांचेही काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहिले आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात ११ पैकी ७ ग्रामपंचायतीवर भाजपचे, २ शिवसेना-ठाकरे गट तर काँग्रेस व अपक्ष यांचे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर प्राबल्य आले आहे.

देवणी तालुक्यातील ८ पैकी ५ ग्रामपंचायती भाजपच्या तर ३ काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. जळकोट तालुक्यातील १३ पैकी सर्वाधिक सात ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आले आहे. काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस २ व शिंदे गटाच्या ताब्यात एक ग्रामपंचायत गेली आहे.

चाकूर तालुक्यात ४६ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस २४ , भाजपा १५, शिवसेना-ठाकरे गट, प्रहार व अपक्ष प्रत्येकी एक असे चित्र आहे.

निलंगा तालुक्यात भाजप व काँग्रेसचे नेते आपल्याच सर्वाधिक जागा असल्याचे सांगत आहेत.

उदगीर तालुक्यात अनेक गावांनी नव्या चेहऱ्यांना स्विकारले आहे. भाजपचे अरविंद पाटील यांनी ५८ पैकी ४३ तर काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर यांनी ४० ग्रामपंचायतीवर आपल्या समर्थकांचा दावा केला आहे.

औसा मतदार संघात ७७ पैकी ५२ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी जाहीर केले आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात ७७ पैकी ५८ ग्रामपंचायती काँग्रेस समर्थकांच्या ताब्यात आल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button