Accident : भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तरुण जागीच ठार | पुढारी

Accident : भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तरुण जागीच ठार

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापुर येथे कळमनुरीकडे जाणाऱ्या दुचाकी आणि बसचा अपघात झाला. या अपघातात तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद बोलके (रा. कळमनुरी) असे मृत तरुणाचे नाव  आहे. (Accident)

प्रमोद बोलके व त्याचा मित्र आनंद मस्के ( रा. आखाडा बाळापूर) हे दुचाकीवरुन कळमनुरीकडून आखाडा बाळापूरकडे जात होते. दरम्यान, या वेळी आखाडा बाळापूर येथून कळमनुरीकडे जाणाऱ्या खासगी बसने साळवा पाठीजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये प्रमोद बोलके यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आनंद मस्के गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार मधुकर नागरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. (Accident)

पोलीस व बसमधील प्रवाशांनी जखमी आनंद मस्के यांना तातडीने उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. अपघातानंतर खाजगी बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

हेही वाचा

Back to top button