नांदेड : विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एकाचा बळी | पुढारी

नांदेड : विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एकाचा बळी

नरसीफाटा; पुढारी वृत्तसेवा : वंजरवाडी येथे फ्यूज बॉक्सच्या बाजूला उघड्यावर पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्क्या बसून एकाचा मृत्यू झाला. संभाजी विठ्ठल जाधव (वय ४५) असे मृत मजूराचे नाव आहे. गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद कुंटूर पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी हा नायगांव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या घराच्या बाजूला जिल्हा परिषद शाळेजवळ विजेचे उघडे फ्यूज बॉक्स आहेत. गुरूवारी रात्री तो कामावरून आला तेव्हा विजेची तार जमिनीवर पडली होती. रात्रीच्या अंधारात जमिनीवर पडलेल्या तारेवर त्याचा पाय पडला. विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

फ्यूज बॉक्स उघडे असल्याची माहिती विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली होती. तरीही विज वितरण कंपनीन दुर्लक्ष केले. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संभाजी याच्या नातेवाईकांनी घेतला. त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून विज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button