परभणी लोकसभेसह चारही विधानसभा जागा जिंकण्याचे रावसाहेब दानवे यांचे आवाहन | पुढारी

परभणी लोकसभेसह चारही विधानसभा जागा जिंकण्याचे रावसाहेब दानवे यांचे आवाहन

परभणी; पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड – परभणी जिल्ह्यात भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठीचा भाजप उमेदवाराचा शोध संपला आहे. त्यामुळे संतोष मुरकुटे यांनी आजपासूनच विधानसभेच्या कामाला लागावे असे, स्पष्ट सुतोवाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले. तसेच परभणी लोकसभेसह जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन भाजप नेते संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त रावसाहेब दानवे यांनी यावेळी केले.

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपाच्या राजकीय सभेचे स्पष्ट स्वरूप आले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे उपस्थित होते. व्यासपीठावर भाजपाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजप प्रवक्ते गणेश हाके, जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सिद्धार्थ भालेराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण डॉक्टर सुभाष कदम महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विजय वरपूडकर, संतोष मुरकुटे यांचे वडिल त्र्यंबकराव (आबा) मुरकुटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव वृद्धडे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, संतोष मुरकुटे यांच्यात भाजपकडून गंगाखेड विधानसभा जिंकण्याची राजकीय ताकद असल्याचे वाढदिवसाच्या गर्दीने स्पष्ट दाखवले आहे. समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या संतोष मुरकुटे यांना गंगाखेड विधानसभेसाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत देईल व संतोष मुरकुटे यांना विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पाठबळ देईल, अशी घोषणाची यावेळी मंत्री दानवे यांनी केली.

रेल्वे राज्यमंत्री भागवत कराड यांनी संतोष मुरकुटे यांच्या रूपाने भाजपला एक युवा नेतृत्व मिळाले असून संतोष मुरकुटे यांनी स्वच्छ समाजकारण व राजकारण करून विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.

एकंदरीतच भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांचा वाढदिवस हा भाजपची आगामी विधानसभेसाठी राजकीय सभास ठरल्याचे उपस्थितांच्या भाषणावरून अधोरेखित झाले आहे.

माझी क्षमता पाहूनच माझा विधानसभेसाठी विचार करा : संतोष मुरकुटे

केवळ आमदारकीसाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नसून समाज हित व सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणून भाजपमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. माझ्या एकंदरीत कार्याची क्षमता पाहूनच भाजपने मला तिकीट देण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे नम्र आवाहन, यावेळी सत्कारमूर्ती संतोष मुरकुटे यांनी केले.

अधिक वाचा :

Back to top button