राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ लातूरमध्ये कडकडीत बंद | पुढारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ लातूरमध्ये कडकडीत बंद

लातूर; पुढारी वृतसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमींनी शुक्रवारी (दि.२५) पुकारलेल्या लातूर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. बंदकालावधीत शाळा- महाविद्यालये दुकाने प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन बंदला दुचाकी रॅलीने सुरुवात झाली. जिजाऊ शिवरायांचा, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करीत रॅलीने शहरातील मुख्य मार्ग व चौक पिंजून काढले. कोश्यारींना हटवा दिल्लीला पाठवा, अशी मागणी त्यांनी केली.

दुपारी एक वाजता राष्ट्रपती‌‌ व मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा विचार हा सदासर्वदा विश्वव्यापी व विश्ववंद्य आहे. जगाने त्यांच्या कार्याची व शौर्याची थोरवी गायली आहे. तथापि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवराय व अन्य महापुरुषांबाबत सातत्याने अवमानकारक विधाने करीत आहेत. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या अशा वर्तनाने राज्यपालपदाचीही प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन तात्काळ हटवावे, अशी मागणी निवेदनातून राष्ट्रपतींना करण्यात आली.

मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषदेत कोश्यारी यांच्याविरुध्द निंदाजनक ठराव मांडून व तो मंजूर करुन केंद्रशासनाकडे पाठवावा व राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, अन्यथा शिवप्रेमी कोणत्याही मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाहीत असा इशारा देण्यात आला.

अधिक वाचा :

Back to top button