वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर रोजी पाहण्याची संधी | पुढारी

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर रोजी पाहण्याची संधी

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या कार्तिक पौर्णिमेस म्हणजेच मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी खंडग्रास स्थितीत होणार आहे. १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असेल. हे भारतातही दिसणार असून उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागरात देखील दृश्यमान होणार आहे. या वेळेस चंद्रग्रहण सुरु असतानाच पुर्व क्षितिजावर चंद्र उगवणार असल्याने या ग्रहणाला ‘ग्रस्तोदित चंद्रग्रहण’ असेही म्हटले जाते.

देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याच्या तयारीत : चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

हे ग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य असल्याने व पूर्व आकाशात उगवताना दिसणार असल्याने रक्तवर्णी चंद्र पाहण्याची मजा काही औरच असणार आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. मराठवाड्यातील सर्व प्रथम नांदेड व हिंगोली येथे सायंकाळी ५:४२ वाजता तर सर्वात शेवटी औरंगाबाद येथे सायंकाळी ५:५० वाजता चंद्रोदय ग्रहण स्थितीतच होईल. आपल्याकडे ग्रहण कमाल ग्रासण्याची वेळ ही ५ वाजून ५७ मिनिटे असणार आहे. यावेळेस पृथ्वीच्या दाट छायेत चंद्र साधारणत: नांदेड व हिंगोली येथे सर्वात जास्त ५२ टक्के तर औरंगाबाद येथे सर्वात कमी ३३ टक्क्याने ग्रासलेला दिसेल. सायंकाळी ६:१९ दरम्यान चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून विरळ छायेत प्रवेश करेल व रात्री ७:२६ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.

औरंगाबाद येथे ग्रहण दर्शन कार्यक्रम

ग्रस्तोदित चंद्रग्रहण दर्शन या खगोलीय उपक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेदरम्यान या ग्रहणाचे छायाचित्रण व अभ्यास गोगा बाबा टेकडीवरून केला जाणार आहे सोबतच यावेळेस दुर्बिणीतून या ग्रहणाचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. ग्रहणातच चंद्रोदय होताना दिसणार असल्याने हौशी छायाचित्रकारांना या ग्रहणाचे फोटो काढण्याची ही एक पर्वणीच असेल.
यात सहभागी होण्याचे आवाहन औरंगाबाद शहरातील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, निसर्ग मित्र मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, एन्व्हारनमेंटल रिसर्च फाऊंडेशन एन्ड एज्युकेशनल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक औंधकर, एन्व्हारनमेंटल रिसर्च फाऊंडेशन एन्ड एज्युकेशनल अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या डॉ. रश्मी बोरीकर, निसर्ग मित्र मंडळचे सचिव किशोर गठडी यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button