जालना: स्टील कारखान्यात भीषण स्फोट : ७ कामगारांचा होरपळून मृत्यू | पुढारी

जालना: स्टील कारखान्यात भीषण स्फोट : ७ कामगारांचा होरपळून मृत्यू

जालना: पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीमधील एका स्टील कारखान्यात मंगळवारी (दि.१) झालेल्या भीषण स्फोटात ६ ते ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गीताई स्टील कंपनीत आज सकाळी स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात भट्टी उद्ध्वस्त झाली. यात ७ कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्य़ात येत आहे. जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत.

या घटनेमुळे जालना औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कामगारांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर कंपन्यांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. मागील काही दिवसांत अनेक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन अनेक कामगार जखमी, आणि मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अनेक संघटनांनी आवाज उठविला. परंतु, प्रशासन ठिम्मच आहे. कंपनी व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे अशा घटनाकडे काणाडोळा केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. परिणामी कामगारांच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब वाऱ्यावर येत आहे. त्यामुळे अशा घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार आणि नागरिकांतून होऊ लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button