पहिलीच वेळ असल्याने माफ करतोय : रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंच एक पाऊल मागे | पुढारी

पहिलीच वेळ असल्याने माफ करतोय : रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंच एक पाऊल मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिली वेळ असल्याने माफ करत आहे. पुन्हा काही केलं तर प्रहारचा वार कसा असतो ते दाखवतो. आम्ही गांधीना मानतो पण, भगतसिंग डोक्यात आहे, असा इशारा देत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर एक पाऊल मागे घेतल्‍याचे जाहीर केले. आज ( दि. १ ) अमरावती येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी कडू म्‍हणाले की, “सत्ता गेली चुलीत, आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, वाटेला आलेल्यांचा कोथळा बाहेर काढतो. साडेतीनशे गुन्हे डोक्यावर घेऊन फिरतो. आम्ही सैनिकांसारखं जगतो, फार विचार करत नाही. राजकारणासाठी एकाही दिव्यांग बांधवांचा वापर केला नाही. ज्याने काही म्हटले असेल तो विषय संपला. आम्ही केली ती बंडखोरी नाही उठाव होता. प्रत्येक पक्षात बंडखोरी आहे. आणि जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंक्तीत आहेत. कोणीही यावे आणि काहीही म्हणावे इतके आम्ही सोपे नाही. पहिली वेळ असल्याने माफ करत आहे”

शिंदे-फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

रविवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात समेटासाठी बैठक झाली होती. त्यानंतर सोमवारी ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांची बैठक झाली. बैठकीनंतर राणा यांनी कडू यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले होते. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरीही व्यक्त केली होती. त्याचवेळी बच्चू कडू यांनीही आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी राणा यांनी केली होती. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राणा आणि कडू यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.

हेही वाचा :

Back to top button