बीड : मांजरा धरणाचे पुनर्जीवन करा: राजकिशोर मोदी | पुढारी

बीड : मांजरा धरणाचे पुनर्जीवन करा: राजकिशोर मोदी

अंबाजोगाई: पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथे विस्तारित असलेले मांजरा धरण हे बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची तहान भागवते. हे धरण बीड जिल्ह्यात असल्याने त्याचे मुख्य कार्यालय हे बीड जिल्ह्यातच असावे. त्याचबरोबर धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी तडे जात आहेत. त्यामुळे शासनाने धरण पुनर्जीवनाच्या कामास सुरुवात करावी, अशी मागणी अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज (दि. १६) केली. मांजरा धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या पाण्याचे पूजन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

मागील साधारणतः ४० वर्षांपूर्वी दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मांजरा धरणाची निर्मिती झाली. पुढील ५० वर्षासाठीच्या पाण्याचे नियोजन करून या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. येणाऱ्या २०३०-३१ साली या धरणाची मुदत संपणार आहे. धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी तडे जात आहेत. यामुळे पुढे होणारा धोका टाळण्यासाठी शासनाने धरण पुनर्जीवनाच्या कामास सुरुवात करावी, अशी मागणी राजकिशोर मोदी यांनी शासनाकडे केली आहे.

मांजरा धरणामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे. धरण निर्मिती पासून १४ ते १५ वेळेस पूर्णपणे भरले आहे. मागील सलग तीन वर्षांपासून मांजरा धारण परतीच्या पावसाने पूर्णपणे भरत आहे. धरणाची निर्मिती शेती सिंचनासाठी झाली होती. मात्र, मागील काही काळापासून पिण्याच्या पाण्यासाठी जास्त प्रमाणात वापर होत आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. धरण क्षेत्रात साधारण ७ ते ८ साखर कारखाने येतात. या कारखान्यामुळे शेकडो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. मागच्या काळात पाऊसमान कमी झाल्याने धरण कोरडे पडले होते. चर खोदून पाणी काढण्याची वेळी आली होती. मात्र आता मांजरा धरण आज १०० टक्के भरल्याने अंबाजोगाई शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. यावेळी डॉ. नरेंद्र काळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, तानाजी देशमुख, मनोज लाखेरा, महादेव आदमाने, संतोष शिनगारे, सुनील व्यवहारे, गणेश मसने, शेख मोईन आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 

Back to top button