सोलापूर : हरणा नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह ४० तासांनी सापडला | पुढारी

सोलापूर : हरणा नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह ४० तासांनी सापडला

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  तुळजापूर तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने हरणा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातून शिवानंद शरणप्पा वाले (वय ५६, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) हा शेतकरी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वाहून गेला. ग्रामस्थ, नातेवाईकांच्या अथक शोध मोहिमेनंतर तब्बल ४० तासाने आज (रविवारी) दुपारी त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला.

शिवानंद वाले हे शेतातील काम आटपून शुक्रवारी रात्री घरी येत होते. रात्रीच्या अंधारात नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. ग्रामस्थांच्या वतीने शनिवारपासून नदीपात्रात त्यांचा शोध सुरू होता. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह मिळून आला.

हरणा नदीला पूर आला आहे. त्यामुळे मुस्ती परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. जुलैमध्ये हॉटेल कामगाराचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी झालेल्या घटनेनंतर अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी करत मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तरीही पुलाचा प्रश्न मार्ग लागला नाही .

आनंदनगरची वाट बिकट

मुस्ती गावाजवळून हरणा नदी वाहते. नदीच्या पलीकडे आनंदनगर (बेघरवस्ती) हा दोन हजार लोकवस्तीचा भाग आहे. नदीच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना नदी पार करावी लागते.

तत्काळ पूल बांधण्याची मागणी

दोन वर्षांपूर्वी सखाराम गायकवाड याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अनेक जण पाण्यात वाहून गेले. मात्र सुदैवाने ते वाचले. तीन-चार महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे बेघर वस्तीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पूल बांधण्याचा प्रश्न सरकारी दप्तरी अद्यापही रखडलेलाच आहे. लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

  हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button