हिंगाेली : माजी आमदार संतोष टारफे यांनी मातोश्रीवर बांधले शिवबंधन | पुढारी

हिंगाेली : माजी आमदार संतोष टारफे यांनी मातोश्रीवर बांधले शिवबंधन

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर नाराज असलेले माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट मुंबईतील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. डॉ. संतोष टारफे यांच्यासोबत अनेक काँग्रेसच्या दिग्गज पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

कळमनुरी विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. संतोष टारफे यांना काँग्रेसकडून सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याचा आरोप केला जात होता. आमदार प्रज्ञा सातव यांनी प्रत्येक ठिकाणी डावलल्याचे सांगत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सोमवारी (दि.२९) रोजी माजी आमदार संतोष टारफे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार अरविंद सावंत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. टारफे यांच्यासोबत कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, जि.प. सदस्य कैलास साळुंके, एस.पी. राठोड, माजी सभापती अशोक बेले, पंचायत समिती सदस्य संजय मस्के, वसंत घुगे, बाळापुर बाजार समितीचे संचालक संजय भुरके, बबनराव सावळे, बापुराव घोंगडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन सोळंके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार संतोष टारफे यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

अजित मगर यांचाही शिवसेनेत प्रवेश

शेतकरी नेते माजी जि. प. सदस्य अजित मगर यांनी सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित मगर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुक लढविली होती. मगर हे दुसर्‍या स्थानावर राहिले होते. मागील अनेक दिवसांपासून मगर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होत होती. अखेर सोमवारी अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार संतोष बांगर यांना कसे रोखणार?

आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार संतोष टारफे, अजित मगर यांना शिवसेनेत प्रवेश दिला. परंतु, अद्यापही शिवसेनेला जिल्हाप्रमुखाची नियुक्‍ती करण्यात यश आले नाही. संघटन कौशल्यात माहीर असलेले आ. संतोष बांगर यांना रोखण्याचे आव्हान शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींसमोर आहे. आमदार बांगर यांनी मात्र आपल्या संपर्कासोबतच विकास कामांचा धडाका वेगाने सुरू केल्याने बांगर यांना रोखण्यासाठी शिवसेनेला प्रयत्‍नाची पराकाष्‍ठा करावी लागणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button