परभणीतील पिकांचे पंचनामे सुरु करा: मेघना बोर्डीकरांची कृषीमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

परभणीतील पिकांचे पंचनामे सुरु करा: मेघना बोर्डीकरांची कृषीमंत्र्यांकडे मागणी

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्हयात ५२ पैकी २४ मंडळात अतिवृष्टी झाली. त्यापैकी १२ मंडळात दोन वेळेस अतिवृष्टी झाली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत. पंचनामे तात्काळ करावेत, अशी मागणी नांदेड येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली.

परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात ३१ पैकी ५ दिवस सोडले, रोज सतत पाऊस झाला. प्रशासनाकडे २४ मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. पुराच्या पाण्यात दोन व्यक्ती वाहून गेल्या आहेत. पुरामुळे मनुष्य, जनावर वाहून दगावली असून नदी, ओढया काठच्या जमीन आणि पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रीमियम भरला नसल्याने एप्रिल महिन्यापासून प्रलंबित आहेत.राज्य सरकारने प्रीमियम विमा कंपनीकडे भरून मदतीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना सहकार्य करावे. पोखरा व महा डीबीटी योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांचे शासनाकडील अनुदान द्यावे, अशीही मागणी आमदार बोर्डीकर यांनी या वेळी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button