औरंगाबाद : आंबा येथील भोंगळे वस्तीवर भर दिवसा चोरी; ७५ हजार रोख रकमेसह तीन लाखांचे दागिने लंपास | पुढारी

औरंगाबाद : आंबा येथील भोंगळे वस्तीवर भर दिवसा चोरी; ७५ हजार रोख रकमेसह तीन लाखांचे दागिने लंपास

कन्नड; प्रतिनीधी : आंबा गावाच्या जवळ असलेल्या भोंगळे वस्तीवर भर दिवसा दुपारी बाराच्या सुमारास धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून ७५ हजार रुपये रोख व तीन लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी घडली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात नोद झाली आहे.

अधिक माहिती अशी की, आंबा गावात हरिनाम सप्ताह असल्याने गावाबाहेर असलेल्या भोंगळे वस्तीवरील सर्वजण गावात गेले होते. याचा फायदा घेत दुपारी बाराच्या सुमारास चोरट्यांनी सुनील पर्वत भोंगळे याच्या घरात चोरी केली. घराचा पाठीमागील दरवाजाचा कडीकोंयडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट व पेट्यांचे कुलुप तोडून त्यातील ९ ग्रॅम सोने व चांदीच्या दागिन्यांसह दहा हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या लिलाबाई पर्वत भोंगळे यांच्या खोलीतील २९ ग्रॅम सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपये रोख तर परभतमहादू भोंगळे यांच्या घरातील दागिने असा सुमारे पंच्याहत्तर हजार रोख व ३ लाख किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

संबंधित शेतकऱ्यांनी कांदा विक्रीतून आलेले पैसे घरात ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, सहायक फौजदार एस. पी. उबाळे, पोलीस हवालदार संदीप कनकुटे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून श्वान पथक पाचारण केले आहे.

Back to top button