औरंगाबाद : पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्याने खांदेपालट; धुरा कोल्हेंकडून काझींकडे | पुढारी

औरंगाबाद : पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्याने खांदेपालट; धुरा कोल्हेंकडून काझींकडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी हेमंत कोल्हे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. आता या विभागाचा पदभार एम. बी. काझी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कोल्हे यांच्याकडून अपेक्षित काम न झाल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी हा बदल केला.

काही महिन्यांपासून शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सध्या शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लागू आहे. मात्र, काही भागांत अजूनही सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. याआधी किरण धांडे यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची धुरा होती. दोन महिन्यांपूर्वी मनपा प्रशासक पांडेय यांनी त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत, ती सेवानिवृत्त होऊन पुन्हा करार पद्धतीने सेवेत दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे सोपविली होती. मात्र, कोल्हे यांच्याकडूनही या दोन महिन्यांत समाधानकारक काम झाले नाही. त्यामुळे आता पांडेय यांनी त्यांच्याकडूनही हा पदभार काढून तो एम. बी. काझी यांच्याकडे सोपविला आहे.

कंत्राटीकडून कंत्राटीकडे

मनपा सध्या पुरेसे कार्यकारी अभियंता नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे हा पदभार देण्याची वेळ आली आहे. कोल्हे हे वर्षभरापूर्वीच सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेली आहे. इतके दिवस त्यांनी पाणीपुरवठ्याची धुरा सांभाळली. आता त्यांच्याकडून हा पदभार काझी यांच्याकडे दिला आहे. काझी हे सेवानिवृत्त झालेले असून त्यांनाही करार पद्धतीने सेवेत घेण्यात आलेले आहे.

Back to top button