परभणी : गैरहजर शिक्षकांना दिला 75 लाख रुपये पगार | पुढारी

परभणी : गैरहजर शिक्षकांना दिला 75 लाख रुपये पगार

परभणी, पुढारी वृत्तसेवा : एका मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेच्या शाळेतील अनुपस्थित शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 74 लाख 90
हजार 496 रुपयांचा पगार देऊन शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन दोन महिला शिक्षणाधिकार्‍यांसह अन्य तीन अशा पाच जणांविरोधात येथील कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 21) गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. वंदना वाहूळ व डॉ. सुचिता पाटेकर या दोन तत्कालीन शिक्षणाणिकारी, मुख्याध्यापिका शहनाज बानो, सहशिक्षक सिद्दीकी मोहम्मद शरफोद्दिन आणि सहशिक्षिका शबाना बेगम खुर्शीद अली अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार कामेल एज्युकेशन सोसायटी संचालित कामेल उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापिका खायम खानी शहनाज बानो (56) व सहशिक्षक सिद्दिकी मोहम्मद शरफोद्दीन मोहम्मद फैजोद्दीन हे सातत्याने अनुपस्थित होते. शिक्षणाधिकारी डॉ. वाहूळ व डॉ. पाटेकर यांनी मुख्याध्यापिकेचे शासकीय अधिकार काढून घेतले होते. शहनाज बानो व सिद्दिकी मोहम्मद शरफोद्दीन यांना शिक्षकांचे पगार काढण्यासाठी स्वाक्षरीचे अधिकार शिक्षणाधिकार्‍यांनी दिले होते. शहनाज बानो यांनी स्वतःला मुख्याध्यापक ठरवून खोटे दस्त, शिक्के तयार करून शिक्षणाधिकारी व इतरांशी संगनमत केले आणि अनुपस्थित शिक्षकांचे मार्च 2019 ते जून 2020 व त्यापुढेही पगार काढले. त्यांनी निधीचा अपहार केल्याची फिर्याद संस्थेचे सचिव मोहम्मद मुश्ताक अहेमद यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार वरील पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर तुरनर हे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button