हिंगोली : कळमनुरी येथे लग्नाच्या जेवणातून नवरदेवासह ५०० नातेवाईकांना विषबाधा | पुढारी

हिंगोली : कळमनुरी येथे लग्नाच्या जेवणातून नवरदेवासह ५०० नातेवाईकांना विषबाधा

कळमनुरी (हिंगोली) ; पुढारी वृत्तसेवा : लग्नसोहळ्यामध्ये जेवणाच्या कार्यक्रमात जेवण केलेल्या जवळपास सर्वच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. इसापूर धरण येथे गेलेल्या वऱ्हाडा बाबतीत ही घटना आज (6 जून) घडली. जवळपास 500 बाधितांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

या बाबत माहिती अशी की, शहरातील नूरी मोहल्ला भागातील रहिवासी शेख मुख्तार यांच्या मुलाचे लग्न ईसापूर धरण येथील मुलीशी विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी वरपक्षाकडून वऱ्हाड सकाळी ईसापूरला पोहचले. लग्न विधी ही पार पडल्यानंतर भोजनाचा लाभ सर्वांनी घेतला. या कार्यक्रमात बिर्याणी तसेच शाही तुकडा असा पदार्थ होता. याचा पाहुणे मंडळींनी अस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी वधूला घेऊन वरपक्ष कळमनुरीला पोहचले.

मात्र दुपारी 4 वाजताच्या सुमारास लग्नात सहभागी झालेल्यांना मळमळ होऊन उलट्या होऊ लागल्या. यावेळी जेवणातून विषबाधा झाल्यामुळे हा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात 50 ते 60 जण उपचारासाठी एकामागून एक दाखल झाले.

डॉ. पारडकर, डॉ. विशाल मोहळे, श्रीकांत सावंत यांच्या खाजगी रुग्णालयातही नवरदेवासह 25 ते 30 बाधित उपचारासाठी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपजिल्हा रुग्णालयात डॉ. आनंद मेने, डॉ. शिवकुमार हजारे, डॉ. संजय माहूरे, कैलास ताटे, अश्विनी सपकाळ, माणिक चित्तेवार, ज्योती नकवाल, साधना पवार, अप्पा कदम, श्रद्धा लोकासे आदी डॉ. व परिचारिका यांनी उपचार केले. या घटनेची माहिती मिळता कळमनुरी पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे व पोलीस कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देत माहिती घेतली.

100 च्या वर बाधितामध्ये लहान मुले, पुरुष व महिला ही आहेत. दरम्यान वधू पक्षातील मंडळींमध्येही या विषबाधाचा प्रकार दिसून आला. त्यामुळे ईसापूर धरण शेंबाल पिंप्री येथे जवळपास 400 जण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तसेच काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुसद येथे हलविण्यात आले अशी माहिती मिळाली.

हेही वाचा

Back to top button