परभणी : दूध दरवाढीसह किसान क्रेडिट कार्डसाठी स्‍वाभिमानीचे आंदोलन | पुढारी

परभणी : दूध दरवाढीसह किसान क्रेडिट कार्डसाठी स्‍वाभिमानीचे आंदोलन

परभणी, पुढारी वृत्तसेवा :  स्‍वाभिमानी : दूध दरवाढ मिळावी, दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासद शेतकर्‍यांना बँकांनी किसान क्रेडीट कार्ड द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर पारंपरिक लोककलावंतांचे गोंधळ, जागरण करून स्‍वाभिमानीकडून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनळस्थळी गाय व वासरू बांधून दिवसभर अन्नत्याग करीत प्रशासनाचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना गायीच्या दुधाचा शासकीय दर पुर्वी 27 रूपये इतका होता.

परंतू खासगी दर कमी झाल्यामुळे शासनाने दरात 2 रूपयांची कपात केली.

सद्यस्थितीत खासगी दर 29 रूपये आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रतिलिटर 4 रूपये प्रमाणे तोटा सहन करावा लागत आहे. चार्‍याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

त्यातच जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतातील संपूर्ण पीक व चारा नाहीसा झाल्याने शेतकरी आणखीच संकटात सापडलेला आहे.

त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या दुधाच्या दरात वाढ करावी, या शिवाय दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांसाठी केंद्र शासनाने किसान क्रेडीट कार्डबद्दल बँकांना पत्र दिले होते.

परंतू अद्यापही बँकांनी किसान क्रेडीट कार्डचे वाटप केलेले नाही.

त्यामुळे या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध उत्पादक शेतकर्‍यांसह हे अभिनव आंदोलन केले.

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी दूध उत्पादक व पुरवठादार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद गमे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, दिपक गरूड, एकनाथ भालेराव, एकनाथ गिराम, माधव तिडके, सुरेश गमे आदी उपस्‍थित होते.

Back to top button