हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय शहर, उपनगरांसह महामार्गावर जोमाने फैलावत आहे. लॉकडाऊनची शिथिलता आणि महापुराच्या विळख्यातून सुटका होताच मुंबई, नागपूरसह कर्नाटक, गोवा आणि पश्चिम बंगालमधून युवतींना आणल्याचे समजते. अनैतिक मानवी व्यापार्यात गुंतलेल्या आंतरराज्य टोळ्यांनी देहविक्रीचा बाजार पुन्हा मांडण्यास सुरुवात केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात छुप्या कुंटणखान्यांचे प्रमाण मोठे आहे. अनैतिक मानवी व्यापारी तस्करीत सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांची जीवघेणी दहशत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असहाय्य सावज शोधायचे अन् वाममार्गाला लावून निष्पापांच्या आयुष्याचा बाजार मांडून त्यावर घसघशीत कमाईचा गोरखधंदा चालविला जात आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली असली, तरी अनैतिक मानवी व्यापारातील उलाढाल वाढली आहे. एजंटांच्या साखळीतून तस्करांनी आर्थिक उलाढाल वाढवली आहे. सायंकाळनंतर रात्रीच्या चांदण्यात महामार्गावर हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय बहरू लागला आहे. वेश्या अड्ड्याच्या दर्शनी बाजूला सन्नाटा दिसून येत असला, तरी पडद्याआड खुल्लमखुल्ला इष्काचा बाजार भरलेला असतो.
अल्पवयीन मुलींना देहव्यापारात ओढले जातेय…
पश्चिम महाराष्ट्रात हायप्रोफाईल वेश्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय रॅकेटमधून अनेक अल्पवयीन मुलींच्या आयुष्याचा चुराडा झाला आहे. जानेवारी 2019 ते जुलै 2021 या काळात 40 वेश्या अड्ड्यांचा पर्दाफाश झाला आहे. 75 पीडित युवतींची सुटका झाली. असहाय्यतेचा फायदा घेत शरीरविक्रीस भाग पाडणार्या 20 महिलांसह 74 एजंटांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 17 वर्षांखालील 8 मुलींची कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली आहे. हे प्रमाण धक्कादायक आहे.
गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव
लॉकडाऊन काळात युवतींच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवित हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा फंडा शहरासह जिल्ह्यात वाढू लागला आहे. चोरी-छुपे चालणार्या वेश्या अड्ड्यांचे लोणही आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही फोफावू लागले आहे. अनैतिक मानवी व्यापार्यात मुंबई, पुण्यासह कर्नाटक, गोवा, पश्चिम बंगाल, आंध—सह अन्य राज्यांतील नामचिन टोळ्यांचा शिरकाव झाल्याने सामाजिकद़ृष्ट्या हा विषय संवेदनशील बनू लागला आहे.
कुंटणखान्यांवर पुन्हा गर्दी !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभाग लॉकडाऊन आहे. रोजंदारी बुडाल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. आर्थिकद़ृष्ट्या कमजोर, असहाय्य युवतींचा गैरफायदा घेत त्यांना वाममार्गाला लावण्यात सराईत टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हप्तेगिरीला सोकावलेल्या स्थानिक यंत्रणांकडून टोळ्यांची पाठराखण होत असल्याने शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात विशेष करून महामार्गावरील कुंटणखाने पुन्हा गजबजू लागले आहेत.
(पूर्वार्ध)