वर्धा महामार्ग : त्या ‘ब्लॅक स्पॉट’वर अज्ञात वाहनाने चिरडले दोन मित्रांना | पुढारी

वर्धा महामार्ग : त्या 'ब्लॅक स्पॉट'वर अज्ञात वाहनाने चिरडले दोन मित्रांना

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथून मोटर सायकलने गावी परत जात असणाऱ्या दोन मित्रांना अज्ञात वाहनाने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वर्धा महामार्गवरील आसोला या ठिकाणी १० मार्च रोजीच्या मध्यरात्री साडे बाराच्या दरम्यान घडली. जयंत केशव मुजबैले (वय-२७) आणि जगदीश सुनील साकरकर (वय-२६) अशी मृतकांची नावे आहे. हे दोघेही राहणार वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील राहाणारे होते. हे दोघेही त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वर्धा महामार्ग)

प्राप्त माहितीनुसार जयंत आणि जगदीश हे दोघेही एकाच गावातील जिवाभावाचे मित्र होते. जयंत याचा पानटपरीचा तर जगदीश याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. जयंतच्या मित्राचे लग्न असल्याने त्यांना नागपूर येथे काही खरेदी करायची होती. तर जगदीशला त्याच्या व्यवसायानिमित्त सीएला भेटायचे होते. दोघांनाही काम असल्यामुळे ते ९ मार्च रोजी एम. एच. ३२, ए. आर. ८८५० क्रमाकांच्या दुचाकीने नागपूरला आले. जयंत आपल्या मित्रासोबत खरेदी करण्यास गेला तर जगदीश आपल्या कामानिमित्त सीएकडे गेला. जयंत हा मित्रासोबत नागपूर मुक्कामी राहणार होता. मात्र जगदीशचे काम आटोपल्यामुळे त्याने जयंतला फोन करून आपण गावी परत जाऊ म्हणून सांगितले. त्यामुळे ते दोघेही परत निघाले.

खूप रात्र झाल्याने घरच्यांना काळजी नको म्हणून त्यांनी आम्ही परत येत आहोत म्हणून केळझर येथील त्यांचा मित्र संजय मेश्राम यांना रात्री सव्वा अकराच्या सुमारास फोन करून कळविले. त्यावेळी ते चीचभुवन या ठिकाणी होते, असे मेश्राम यांचे म्हणणे आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास ते दोघेही वर्धा मार्गावरील आसोला या ठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी असलेल्या ब्रेकरवर कुणी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. त्यात चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यावेळी दोघांचाही मृत्यू झाला होता. (वर्धा महामार्ग)

वर्धा महामार्गावरील आसोला येथील हे घटनास्थळ बुटीबोरी पोलीस हद्दीतील सर्वात संवेदनशील ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आजवर अनेक अपघात झाले असून त्यात कित्येकांचे बळी गेले आहेत. आसोला निवासी आणि महामार्ग प्रशासन यांच्या वादात येथील उड्डाणपुलाचे काम रखडले गेले आहे. मात्र त्यांच्या वादात अजून किती बळी जातील याचे कुणालाही सोयरसुतक नाही. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत वादावर तोडगा काढण्याची मागणी नेहमीच होते.

Back to top button