उसाची ट्रॉली टेम्पो, दुचाकीवर उलटून दोन ठार, सहा जखमी | पुढारी

उसाची ट्रॉली टेम्पो, दुचाकीवर उलटून दोन ठार, सहा जखमी

केंबळी ; पुढारी वृत्तसेवा : व्हनाळीजवळील वाघजाई घाटात रविवारी रात्री आठ वाजता उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली छोटा टेम्पो आणि दुचाकीवर उलटली. यामध्ये दोघे ठार झाले, तर सहाजण जखमी झाले. दीक्षांत नितीन कांबळे (रा. इचलकरंजी) आणि हिराबाई महादेव माने (रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) अशी मृतांची नांवे आहेत.

टेम्पोमधील व दुचाकीवरील सुमारे बारा प्रवाशी ऊसाच्या ट्रॉलीखाली अडकले होते. या सर्वांना इतर लोकांनी बाहेर काढले. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

छोटा टेंम्पोमधील प्रवाशी आदमापूर येथील संत बाळूमामाचे दर्शन घेऊन परत येत होते. त्यांच्या पाठोपाठ इचलकरंजी येथील दुचाकीस्वार होता. यावेळी अचानक ऊसाची ट्रॉली टेम्पो व दुचाकीवर कोसळली. या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

टेम्पोमधील प्रवाशी कागल आणि सिध्दनेर्लीतील नदी किनारा येथील रहिवाशी आहेत. छोटा टेम्पो अनिल शिंदे (रा. एकोंडी, ता. कागल) यांचा आहे. ऊसाचा ट्रॅक्टर हिंदुराव ईश्‍वर काशिद (रा. बेलवळे बुद्रुक, ता. कागल) यांच्या मालकीचा आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button