इचलकरंजी मध्ये आजी-माजी नगरसेवक भिडले | पुढारी

इचलकरंजी मध्ये आजी-माजी नगरसेवक भिडले

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : नगरपालिकेतील ताराराणी आघाडीचे नगरसेवक सागर चाळके आणि माजी नगरसेवक मोहन कुंभार यांच्यात बुधवारी नगरपालिकेत पुन्हा वादावादी झाली. यावेळी अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. काही नगरसेवकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे पालिकेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण निवळले.

दरम्यान, हा वाद शिवाजीनगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. वादावादीप्रकरणी माजी नगरसेवक मोहन कुंभार व मक्‍तेदार प्रिया नाईक यांच्या परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

इचलकरंजी पालिकेतील एका महिला मक्‍तेदाराने केलेल्या विकासकामांबाबत कुंभार यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. याच कारणातून ही वादावादी झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वीही चाळके आणि कुंभार यांच्यात नगराध्यक्षांच्या दालनात जोरदार भांडण झाले होते. या जुन्या वादाची किनार आजच्या वादावादीसाठी कारणीभूत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती. प्रभाग क्रमांक 29 मध्ये एका महिला मक्‍तेदाराने पालिका इमारतीच्या डागडुजीचे काम केले आहे. या कामाबाबत कुंभार यांनी माहिती मागवली आहे.

यातूनच आज कुंभार आणि त्या महिला मक्‍तेदार यांच्यात दुपारी दीडच्या सुमारास वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेला. दरम्यान, या ठिकाणी सागर चाळके आले. त्यानंतर कुंभार आणि चाळके यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वाद वाढत जाऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुरू झाला. त्यामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले.

प्रसंगावधान राखून नगरसेवक मदन झोरे, विठ्ठल चोपडे, प्रकाश मोरबाळे आदींनी तातडीने हस्तक्षेप करीत समजूत घातली. मात्र, दोघेही एकमेकांना शिवीगाळ करीत असल्याने तणाव कायम होता. यापूर्वीही पालिकेत नगरसेवकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालिका म्हणजे हाणामारीचा आखाडाच असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून उमटत होती.

Back to top button