कोल्हापूर: पुलाची शिरोलीत प्रेम प्रकरणातून तरूणाचा निर्घृण खून; मुलीच्या वडिलाला अटक | पुढारी

कोल्हापूर: पुलाची शिरोलीत प्रेम प्रकरणातून तरूणाचा निर्घृण खून; मुलीच्या वडिलाला अटक

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून तरूणीच्या बापानेच धारधार शस्त्राने वार करून तरूणाचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.१४)  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली, सांगली फाटा येथील मंगल कार्यालय येथे घडली होती. खून करून पसार झालेला योगेश सुरेश सुर्यवंशी (वय ४८, रा. पेठ वडगाव)  याचा शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शोध घेऊन कर्नाटकातून ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, खून झालेल्या तरूणाचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीत बुधले मंगल कार्यालय येथे वाढदिवसाचा कार्यक्रम होता. संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्रासोबत मंगल कार्यालयात आला. याबाबत मुलीच्या नातेवाईकांना कळाल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून मुलीच्या वडिलाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले. त्यावेळी कोणीच आडवण्यासाठी पुढे आले नाही त्याच्या सोबत आलेल्या मित्रास ही मुलीच्या नातेवाईक मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल काढून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत संकेतचा मित्र तेथून पळून गेला. संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता.

संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न

संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते. तो लेखी परीक्षेत पास झाला होता. काही दिवसांत त्याची शारीरिक व मैदानी परीक्षा होणार होती. त्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता. संकेत पाच वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर संकेतची आई त्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्याने केला होता. संकेतच्या मृतदेहावर पाडळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या खुनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि पंकज गिरी तपास करीत आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर: टोप कासारवाडी येथे अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर: राशिवडेतील शेतकऱ्यांच्या मुलांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

कोल्हापूर : जंगली डुकराच्या शिकारी प्रकरणी एकास अटक

 

Back to top button