केंद्रीय राखीव पोलीस दलातील हवालदार जवानाचा मृत्यू | पुढारी

केंद्रीय राखीव पोलीस दलातील हवालदार जवानाचा मृत्यू

कसबा वाळवे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार या पदावर सेवेत असणारे राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील एनडीआरएफ जवान दयासागर शामराव खोत (वय ३६) सुट्टीवर आले होते. ब्रेन स्ट्रोकने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे राधानगरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान दयासागर शामराव खोत हे गुजरात येथे हवालदार या पदावर सेवेत होते. गेल्या महिन्यात ते सुट्टीवर आले होते. शुक्रवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास त्यांना डोक्यात तीव्र वेदना होऊन ब्रेन स्ट्रोक झाला होता. तातडीने त्यांना कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.

चार दिवस चाललेली त्यांची मृत्यूशी झुंज आज (दि.7) अपयशी ठरली. उपचार चालू असताना, सुट्टी संपण्याच्या दिवशीच सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले. 2005 साली भरती झालेले दयासागर खोत यांना 19 वर्षे केलेल्या सेवेत त्यांना “आंतरिक सुरक्षा पदक” मिळालं होत. केंद्रीय पोलीस दलाअंतर्गतच त्यांनी सात वर्षे एनडीआरएफसिक्स बटालियनमध्येही त्यांनी सेवा बजावली होती.

चांदेकरवाडी येथील दत्त मंदिर पटांगणात केंद्रीय राखीव पोलीस दल बटालियनच्या पुणे येथील जवानांनी मानवंदना दिली. शाहू महाराज छत्रपती, आमदार प्रकाश आबिटकर, उमेशराव भोईटे, अशोकराव फराकटे, सरपंच सीमा खोत यांच्यासह, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ आणि परिसरातील शेकडो लोकांच्या उपस्थितीत, अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button