संविधान आणि शेतकऱ्यांसाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देणार : राजू शेट्टी | पुढारी

संविधान आणि शेतकऱ्यांसाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देणार : राजू शेट्टी

किणी; पुढारी वृत्तसेवा : जगातील उत्कृष्ट संविधानापैकी डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. याच्या रक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी पेठवडगाव येथे बोलताना केले.

पेठवडगाव येथील नगरपालिका चौकातआयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी मच्छिंन्द्र कुंभार होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले रोजगार निर्माण करण्याची शाश्वत क्षमता शेतीमध्ये आहे. असे असताना मोदी सरकारने शेती उद्योगाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शेतीवर अवलंबून असणारे पुरक व्यवसाय अडचणीत आले आहेत.

यामुळेच बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकार व्यवसाय वाढविण्याऐवजी मुठभर उद्योजकांची कर्जे माफ केली. केंद्र ८० कोटी गरीबांना धान्य देतोय असे म्हणते. २०१४ला ही संख्या २५ कोटी होती. तर २०२४ पर्यत यामध्ये ११ कोटी वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्राची आर्थिक धोरणे फसलेली आहेत. दस्तुरखुद्द अर्थमंत्र्यांचे पती यावर भाष्य करतात. यातच सर्व समजून येते. गरीब हा गरीब बनत आहे. तर श्रीमंत अधिकच सक्षम होत आहे. त्याच्या हाताखाली गरीब गुलाम बनून राहणारी व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ते म्हणाले, शेतकऱ्याला त्यांच्या शेतात कष्ट करून योग्य मोबदला मिळत नाही. धोरणामुळे शेतीकडे पाठ फिरविण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे श्रीमंतांची १४ लाख ५६ कोटीची कर्जे शासन माफ करत आहे. लोकसभेत बहुमताच्या जोरावर भाजप संविधान बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पण संविधान वाचविण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहू. असे शेवटी शेट्टी यांनी सांगितले. यावेळी जालिंदर पाटील म्हणाले, शेट्टींचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून सर्वजण कामाला लागले आहेत.मात्र मराठा आरक्षण लढा सुरू असताना हे कुठे गेले होते.पेठवडगाव सारख्या शहरातून खासदार हरवल्याची तक्रार मराठा बांधवांनीच केली होती याची आठवण आहे का? स्वागत सत्वशील जाधव यांनी केले.जयकुमार कोले, बजरंग लोणारी, आप्पा एडके, अमर कदम यांची भाषणे झाली.यावेळी विविध गावांतून जमा झालेला निवडणूक निधी राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Back to top button