चार लाख टनांनी घटणार यंदा राज्याचे मत्स्योत्पादन | पुढारी

चार लाख टनांनी घटणार यंदा राज्याचे मत्स्योत्पादन

सुनील कदम

कोल्हापूर : वार्षिक 15 हजार कोटी रुपयांची नेत्रदीपक उलाढाल असलेल्या महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायावर संकटांचे ढग घोंघावत आहेत. निसर्ग आणि मानवनिर्मित कारणांमुळे यंदा राज्यातील मत्स्य उत्पादन चार लाख टनांनी घटण्याच्या धोक्याची घंटा वाजत आहे. त्यामुळे यंदा राज्यात मत्स्य दुष्काळ ओढवण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत.

देशातील वार्षिक मत्स्य उत्पादन जवळपास एक कोटी 75 लाख टनांच्या आसपास आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सहा लाख टनांचा आहे. मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक लागतो. राज्यात सागरी मासेमारीबरोबरच गोड्या पाण्यातील मासेमारीही मोठ्या प्रमाणात चालते. गेल्यावर्षी सागरी मासेमारीतून 4 लाख 32 हजार 748 टन मत्स्य उत्पादन मिळाले होते; तर गोड्या पाण्यातील मासेमारीतून एक लाख 56 हजार 688 टन मत्स्य उत्पादन मिळाले होते.

लाखो लोकांची उपजीविका!

राज्यातील लाखो लोकांची उपजीविका मासेमारीवर अवलंबून आहे. राज्यात एकूण 76 हजार 298 सागरी मच्छीमार असून 56 हजार 553 मत्स्य विक्रेते आहेत. याशिवाय मासेमारीशी संबंधित जोडधंदे (जाळी विणणे, माशांवर प्रक्रिया करणे, साफसफाई करणे, मशिन, नावा आणि बोटींची दुरुस्ती) करणारे असे 50 हजार 341 कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील गोड्या पाण्यात मासेमारी करणारे जवळपास 3 लाख 32 हजार कामगार आहेत. निमखार्‍या पाण्यातील मासेमारीवरही शेकडो लोक अवलंबून आहेत. या सगळ्यांचा विचार केला तर राज्यातील जवळपास 10 ते 12 लाख लोकांची रोजीरोटी मासेमारीवर अवलंबून आहे.

सागरी मासेमारीतून राज्याला गेल्यावर्षी 6654 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे; तर गोड्या पाण्यातील मासेमारीतून 1915 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. राज्यातून दरवर्षी साधारणत: 2 लाख टन माशांची निर्यात होते. गेल्यावर्षी राज्यातून 1 लाख 86 हजार 247 टन माशांची निर्यात करण्यात आली होती. या माध्यमातून 5878 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले होते. ही सगळी आकडेवारी विचारात घेता मत्स्य व्यवसायाचे अर्थकारण जवळपास 15 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे दिसून येते.

यंदा मात्र राज्यातील मत्स्य व्यवसायाला जणू काही दृष्ट लागल्यासारखी स्थिती झाली आहे. यंदा राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक जलाशय कोरडे पडलेले आहेत. गोड्या पाण्यातील मासेमारीवर त्याचा परिणाम झालेला आहे. अवकाळी पावसाबरोबरच यंदा समुद्रात वेळी-अवेळी वादळे होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

समुद्रात तयार झालेत झिरो ऑक्सिजन झोन!

कारखान्यांमधील रसायन व तेलमिश्रित पाणी, तसेच शहरांच्या सांडपाण्यामुळे प्रदूषण होऊन समुद्रात अनेक ठिकाणी ‘झिरो ऑक्सिजन झोन’ तयार झाले आहेत. कित्येक चौरस किलोमीटरच्या या परिसरातील समुद्राच्या पाण्यात ऑक्सिजनच नाही. हे झिरो ऑक्सिजन झोनच झिरो फिश झोन बनले आहेत. तिथे मासेच मिळत नाहीत.

मत्स्य दुष्काळाला ‘हे’ घटक कारणीभूत

* यांत्रिक बोटींची (पर्ससीन) संख्येत बेसुमार वाढ
* अनिर्बंध मासेमारीमुळे समुद्रातील माशांच्या अनेक जाती लुप्त
* मासेमारीसाठी एलईडी दिव्यांच्या वापरामुळे मत्स्यधन गायब
* कर्नाटक आणि गुजरातेतून मच्छीमारांची घुसखोरी
* चोरटी मासेमारी करणार्‍या हायस्पीड बोटींचाही फटका
* प्रदूषणासह अन्य कारणांमुळे मासे मोठ्या प्रमाणावर नष्ट

Back to top button