Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून चेतन नरके यांची माघार; कोणाला पाठिंबा देणार? | पुढारी

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून चेतन नरके यांची माघार; कोणाला पाठिंबा देणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. अनेक पक्षाने पाठिंबा दिला होता. परंतु, शेवटच्या क्षणी अपयश आले. अशी खंत व्यक्त करत गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज (दि.१७) पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे नरके यांनी स्पष्ट केले. Kolhapur Lok Sabha

पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविल्यास तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे असते. त्यामुळे अपक्ष लढण्यापेक्षा निवडणुकीतून माघार घेत आहे. परंतु, कोल्हापूरच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे, असे नरके यांनी यावेळी सांगितले.

मला कोल्हापुरातच काम करायला आवडेल, असे सांगून तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे. त्याचबरोबर थायलंडसह आशिया खंडातील अनेक देशांसोबत साम्यंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चेतन नरके कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेटही घेतली होती. परंतु, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे गेला. आणि येथून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नरके यांची कोंडी झाली. लोकसभा निवडणूक अपक्ष लढविण्यात मोठ्या मर्यादा असतात. त्यामुळेच नरके यांनी निवडणुकीतूनच माघार घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा 

Back to top button