सरवडे: राधानगरी- भुदरगड तालुक्यानेच नव्हे, तर जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांनीही मेव्हण्या पाहुण्यांचा ताणलेला संघर्ष पाहिला. मेव्हण्या पाहुण्यांच्यातील अंतर्गत धुसफूस मागील १० वर्ष चालल्याने कोणाचीच रोखठोक भूमिका नसल्याने अंतर्गत कुरघुड्या वाढून संघर्ष टोकाला गेला. तो इतका ताणला गेला की दोघांनीही सवतासुभा मांडला. परंतु, आता लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. Kolhapur Lok Sabha
खासदार संजय मंडलिक यांच्याशी त्यांचा जुना दोस्ताना आहे. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्याशी असणारे मैत्रीचे संबंध पाहता ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ए. वाय. यांनी ३५ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्ते व पै पाहुण्यातील सलोखा तुटू नये, म्हणून कोणतीही मोठी रिस्क आजतागायत घेतली नव्हती. त्यांना आमदारकी किंवा बिद्रीचे चेअरमनपद दोन्हीपैकी काहीच वाट्याला आलेले नाही. परंतु, लोकसभेचे रणांगण तापलेले असतानाही त्यांची दिशा स्पष्ट होत नाही. व आपले पत्ते खुले करणेही अडचणीचे ठरत आहे. Kolhapur Lok Sabha
आपल्या गटाचा निर्णय २-३ दिवसांत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचा वेळोवेळी त्यांना अनुभव येऊनही पक्षनिष्ठा सोडलेली नाही. मात्र, बिद्रीच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता त्यांनी लोकसभेला कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा व पदे…
मागील ३५ वर्षे पै पाहुण्यांचे नाते घट्ट बांधून ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष वाढीसाठी राबलो. घरात पदे घेण्याचा मोह कधीही मनाला शिवला नाही. ज्या ज्या कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे दिली. तेच लोक सोडून गेल्याची खंत वाटते. परंतु, तरीही कार्यकर्ते हीच आपली ऊर्जा व पदे आहेत. लोकसभेला कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय २-३ दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहे.
- ए. वाय. पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
हेही वाचा