वैद्यकीय शिक्षणाचे टेन्शन; 1200 जणांचा अभ्यासक्रमाला रामराम | पुढारी

वैद्यकीय शिक्षणाचे टेन्शन; 1200 जणांचा अभ्यासक्रमाला रामराम

एकनाथ नाईक

कोल्हापूर : देशात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तब्बल 122 जणांनी गेल्या पाच वर्षांत आत्महत्या केली, तर 1200 विद्यार्थ्यांनी एमबीबीएस व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडले आहे. महाराष्ट्रही यामध्ये मागे नाही. राज्यातील 12 विद्यार्थ्यांनी एमबीबीएसचे, तर 85 पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडल्याचे भीषण वास्तव राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अहवालातून समोर आले आहे. या आकडेवारीवरून वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा कोट्यवधीचा खर्च, शिक्षणाचा ताण यामुळे डॉक्टरांनाच आता टेन्शन आले आहे. वैद्यकीय शिक्षणातील ही गळती रोखण्यासठी आता प्रशासनाने पावले उचलली आहेत.

वैद्यकीय शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तुफान स्पर्धा असते. पालकांच्या अपेक्षाही मोठ्या असतात. यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जातो. काही जन तर शैक्षणिक कर्ज घेऊन हा खर्च भागवतात. यामुळे अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर येते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य, ताणतणाव, मानसिक समस्या जाणवू लागल्या आहेत. परिणामी, एक तर आत्महत्या, नाही तर शिक्षण सोडून दुसरा पर्याय वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून निवडला जात आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने विद्यार्थ्यांच्या गळतीची गंभीर दखल घेतली आहे. देशभरातील प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे वैद्यकीय महाविद्यालयांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे मनोबल, आत्मविश्वास, ताणतणाव, नैराश्य दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

गेल्या पाच वर्षात एमबीबीएस अर्धवट सोडलेले विद्यार्थी

बिहार-18, गुजरात-17, कर्नाटक-17, उत्तर प्रदेश-15, पश्चिम बंगाल-15, आंध्र प्रदेश-13, महाराष्ट्र-12, तमिळनाडू-11,केरळ-8, ओडिसा-5, राजस्थान-5, पद्दुचेरी-3, पंजाब-3, दिल्ली-3, मिझोराम-2, हरियाणा-1, मध्य प्रदेश-1, जम्मू काश्मिर- 1

गेल्या पाच वर्षात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेले विद्यार्थी

दिल्ली – 155, उत्तर प्रदेश-122, उत्तराखंड-103, राजस्थान-98, गुजरात-98, कर्नाटक-96, महाराष्ट्र-85, पश्चिम बंगाल-45, तेलंगणा-41, आंध्र प्रदेश-38, जम्मू काश्मिर-30, आसाम-30, हरियाणा-27, चंदिगढ-25, मध्यप्रदेश-17

यावर्षी देशात 222 डॉक्टरांनी सोडले पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण

यावर्षी देशातील 222 डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण, तर 153 विद्यार्थ्यांनी एमबीबीएसचे शिक्षण अर्धवट सोडले आहे. वैद्यकीय शिक्षण सोडणार्‍यांचा आकडा वर्षागणिक वाढत आहे. ही चिंतेची बाब असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

Back to top button