fake note : कमाईचा जोरात धंदा ! | पुढारी

fake note : कमाईचा जोरात धंदा !

दिलीप भिसे

कोल्हापूर : बनावट नोटांची छपाई करून फसवणूक करणार्‍या कोल्हापूरसह कराड व पुण्यातील टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला; पण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 पासून संशयितांचे कारनामे सुरू आहेत. या रॅकेटमध्ये मुंबईसह आंतरराज्य टोळ्यांचे कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती आहे. झटपट श्रीमंतीच्या फंड्यातूनच हा प्रकार सुरू आहे.

कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, सांगली, सातारा व पुण्यातील बाजारपेठांमध्ये पाचशे व शंभर रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटांची चलती असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. तीन-चार महिन्यांपूर्वीही बाजारात बनावट नोटा आढळल्या होत्या. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असती, तर बनावट नोटा छपाई प्रकरणात सक्रिय संशयितांच्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला असता. राजारामपुरी येथील एका एटीएम सेंटरमधील डिपॉझिट मशिनमध्ये 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा आढळून आल्या. बँक व्यवस्थापनाने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घतली. पैसे जमा झालेले बँक खाते मुंबईतील एका तरुणाचे असल्याचे आणि संबंधितांच्या नावे ज्याने पैशाचा भरणा केला, ती व्यक्ती कोल्हापुरातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बनावट नोटा प्रकरणाचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला, ही वस्तुस्थिती.

म्हणे मिळकतीचा जादूई दिवा!

संशयित कुंदन पुजारी याच्याकडील आलिशान मोटारी, महागडे राहणीमान, सोबत साथीदारांचा घोळका, अंगावर सोन्याची श्रीमंती हा चर्चेचा विषय होता. त्याच्या सावकारीचीही चर्चा होती; मात्र त्याच्या मिळकतीचा जादूई दिवा बनावट नोटांमध्ये दडल्याचे निष्पन्न झाले आहे. बनावट नोटा प्रकरणी शाहूपुरी पोलिसांच्या चौकशीत काही धंदेवाईक मंडळींचा हस्तक्षेप चर्चेचा विषय बनला होता. रात्रंदिवस पोलिस ठाण्यात ऊठबस असलेल्या तडजोड फेम समीरने तपास पथकांवर दबावतंत्राचा प्रयत्न केला. आर्थिक आमिषही दाखविले. सावकार पुत्राला अभय देण्याची सुपारी घेतल्याची चर्चा होती. हा प्रकार निदर्शनास येताच तपास अधिकार्‍यांनी सुपारीबहाद्दराला बाहेरचा रस्ता दाखविला.

निवडणुकीच्या तोंडावर अनर्थ टळला!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क आहे. आर्थिक प्रलोभनाबाबत थेट कारवाईचे आदेश असताना बनावट नोटा प्रकरणाचा भांडाफोड झाल्याने जिल्ह्यात मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया आहे. कदाचित बनावट नोटांचा प्रलोभनासाठी वापर होऊ शकला असता अथवा हॉटेल, ढाब्यांवरील जेवणावळीच्या गर्दीत हजारो बनावट नोटांचा गल्ला झाला होता.

इतर राज्यांतील नोटांची चर्चा

संशयित कुंदन प्रवीण पुजारीसह रोहन सूर्यवंशी (गडमुडशिंगी, ता. करवीर), केतन जयवंत थोरात-पाटील (रा. कराड, सातारा) नोटा छपाई करणारा रोहित तुषार मुळे (मलकापूर, सातारा) यांची नावे निष्पन्न होताच 7 जणांना अटक केली. संशयितांच्या दीड वर्षातील आर्थिक उलाढालीच्या चौकशीची मागणी पुढे येत आहे. शिवाय कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानमधील बनावट नोटा छपाईची चर्चा आहे.

खुलेआम व्यवहार!

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांचा सहा महिन्यांपासून हा धंदा बहरला होता. बनावट नोटांच्या छपाईपासून नोटा चलनात आणण्याची प्रत्येकावर जबाबदारी निश्चित होती. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नवी मुंबई परिसरात टोळीने व्याप्ती वाढविल्याचेही समजते.

Back to top button