flame of forest : चैत्रातील वसंतोत्सव बहरला: पळस,बहावा फुलला; लवकरच मान्सूनचे आगमन | पुढारी

flame of forest : चैत्रातील वसंतोत्सव बहरला: पळस,बहावा फुलला; लवकरच मान्सूनचे आगमन

राजकुमार चौगुले

किणी :  हळदी कुंकू निसर्गाचे गुलमोहर अन् बहावा ! पहाताच शब्द उमटे वाहवा वाहवा ॥ चैत्रगौरी पूजनाला सृष्टी आता निघाली । पायघड्या लाल पिवळ्या पाहूनी ती हरवली | लाल गर्द पळसाच्या फुलांनी आसमंतात अंगार पेटल्याचा भास होत असतानाच असंख्य सोनेरी झुंबरांच्या लटकन्याने ‘बहावा’चे सौंदर्य लोकांना वेड लावत आहे. नेचर इंडिकेटर म्हणून प्रख्यात असलेला बहावा एप्रिलमध्येच फुलल्याने यावर्षी मान्सून लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. flame of forest

बहावा, गुलमोहोर, पळस (फ्लेम ऑफ फॉरेस्ट’), काटेसावर, पांगारा अशा प्रकारची औषधी आणि अध्यात्मिक ओळख असणारी अनेक झाडे आता चांगलीच फुलल्याने वेगळ्याच सौंदर्याची प्रचिती येत आहे, हिवाळ्यानंतर पळस ,बहावा, काटेसावर, पांगारा या वृक्षांची पूर्णपणे पानगळ झाल्याने हे वृक्ष पर्णहीन असतात. ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुगुणी पळसाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. तर या झाडाच्या पानांची पत्रावळी द्रोण बनविण्याच्या उद्योगाने अनेकांना रोजगार मिळवून दिला होता. धार्मिक कार्यात सणासुदीला या पत्रावळीला खूपच महत्व आहे. flame of forest

याबरोबरच काटेसावर (शाल्मली) व पांगारा यांचेही आयुर्वेदात तसेच अध्यात्मात खूप महत्व आहे .बहाव्याच्या झुंबरांच्या किंवा झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘गोल्डन शॉवर ट्री’ म्हणून ओळखला जातो.झाडाखाली गेल्यानंतर खरोखरच अंगावर गोल्डन शॉवरिंग होत असल्याच्या अनुभवाने अनेकजण सुखावत आहेत. बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. या शेंगेला आयुर्वेदात खूप महत्व आहे.

विविध त्वचारोग, कफ, रक्तपित्त, गंडमाळा, मूळव्याध, स्त्रियांचे आजार यावरही बहावा उपयुक्त ठरतो. बहाव्याला संस्कृतमध्ये ‘अरग्वध’ म्हणजेच रोगांचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते. अन्य अनेक फळांपेक्षा बहाव्याच्या गरात जास्त कॅल्शियम असते. फुलांच्या झुबक्याची भाजी आणि शेंगांची बर्फी केली जाते. पूर्णपणे भारतीय असलेल्या या वृक्षाचे अस्तित्व देशभर आढळते. हा बहावा फुलल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांत मान्सूनचे आगमन होते.  म्हणजे अगोदरच पावसाची चाहूल देणारा हा वृक्ष ‘नेचर इंडिकेटर’ म्हणूनही ओळखला जातो.

बहावा, पळस या अनकोपयोगी वृक्षाचे पश्चिम महाराष्ट्रात खूपच कमी अस्तित्व आढळते. मूलतः देशी आणि औषधी असणाऱ्या आणि आपल्याकडे नामशेष होत चाललेल्या या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी जिथे जागा मिळेल. तिथे एक झाड तरी लावावे.
– डॉ. अश्विनी माळकर, अध्यक्षा आरोग्यभारती

हेही वाचा 

Back to top button