कोल्हापूर : अंबाबाईचा चेहरा, किरीटचे तातडीने संवर्धन आवश्यक | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाईचा चेहरा, किरीटचे तातडीने संवर्धन आवश्यक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई देवीच्या मूर्तीचा चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन गरजेचे आहे. मूर्ती भक्कम करण्याकरिता ईथिल सिलिकेटचे द्रव्य वापरून मूर्तीवरील तडे मुजवता येतील. तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील, असे मत निवृत्त पुरातत्त्व अधिकार्‍यांनी नोंदविले आहे. दरम्यान, मूर्ती पाहणीचा अहवाल पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी गुरुवारी कोल्हापूर न्यायालयात सादर केला. याबाबतची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) कोल्हापूर यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यामध्ये वादी गजानन मुनीश्वर व इतरांनी पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त अधिकार्‍यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार 14 व 15 मार्च रोजी देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यात आली. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी ही पाहणी केली. पाहणीचा अहवाल 4 एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्याचे घोषित केले होते. त्यानुसार तो सादर करण्यात आला. सुनावणीला अ‍ॅड. नरेंद्र गांधी, अ‍ॅड. ओंकार गांधी, वादी गजानन विश्वनाथ मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई, अ‍ॅड. प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

अहवालातील तज्ज्ञांचे अनुमान

देवीच्या मूर्तीच्या पाहणीच्या आठ पानांच्या अहवालात मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज झाली आहे. ही झीज 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. त्याचबरोबर देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यांवर तडे गेले असून, ते तडे या 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्याने गेलेले आहेत. यामुळे चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन गरजेचे आहे. संवर्धन प्रक्रिया करताना वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचा अनुमान तज्ज्ञांनी काढला आहे. त्याचबरोबर अन्य ठिकाणच्या लेपालाही तडे असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मूर्ती संवर्धनासाठी सुचविलेले उपाय

अहवालात मूर्ती भक्कम करण्यासाठीचे उपायही सुचविले आहेत. ईथिल सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे मुजवता येतील. तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील. अखेरीस रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल, असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून योग्य ती काळजी घेणे. मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे. मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सवमूर्तीला फुलांचे हार घालणे. गर्भगृहातील संगमरवर काढणे कीटकांचा उपद्रव होऊ नये याकरिता योग्य ती उपाययोजना करणे तसेच आर्द्रता व तापमान यांचे नियंत्रण करणे अलंकार व किरीट घालताना योग्य ती काळजी घेणे, अशा प्रकारच्या सूचनाही केल्या आहेत.

Back to top button