कोल्हापूर : रंकाळा टॉवरजवळ सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा थरार; ‘आलेला वाद मिटवण्यासाठी पण…’ जाणून घ्या नेमकं काय घडलं | पुढारी

कोल्हापूर : रंकाळा टॉवरजवळ सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा थरार; 'आलेला वाद मिटवण्यासाठी पण...' जाणून घ्या नेमकं काय घडलं

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : यादवनगरातील दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून अजय दगडू शिंदे ऊर्फ रावण (वय 35, रा. यादवनगर) या तरुणाचा चार ते पाच हल्लेखोरांनी एडका, कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी डोक्यावर, पाठीवर सपासप वार करून निर्घृण खून केला. गर्दीने गजबजलेल्या रंकाळा टॉवरजवळ चौपाटीवर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सहाजणांना ताब्यात घेण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी झालेले भांडण मिटविण्यासाठी अजय शिंदे व त्याच्या मित्राला रंकाळा टॉवरजवळ बोलवले होते. त्यानुसार अजय त्याचा मित्र आकाश शिंदेसोबत तेथे आला असता चार ते पाच तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये अजय जागीच ठार झाला. आकाश शिंदे हा जखमी झाला आहे. यादवनगरातील अजय शिंदे गटाचे

तरुण आणि अक्षय, सचिन, रोहित,

अर्जुन (पूर्ण नावे समजली नाहीत) या तरुणांच्या दोन गटांत काही दिवसांपासून वाद धुमसत आहे. या वादातूनच दोन दिवसांपूर्वी अजय शिंदे गटाच्या काही तरुणांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटला होता. या वादाचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता होती.

गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अजयला दुसर्‍या गटातील काही तरुणांचा फोन आला. वाद मिटवायचा आहे. ताबडतोब रंकाळा टॉवरजवळ ये, असे त्या तरुणाने सांगितले. त्यानुसार अजय शिंदे हा आकाश शिंदे व अन्य काही मित्रासोबत तेथे गेला. अजय शिंदे तेथे दिसताच चार ते पाच हल्लेखोर तरुण हातात कोयता, एडका घेऊन धावतच अजय शिंदेच्या दिशेने आले. यावेळी अजय धावत सुटला. हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला रंकाळा चौपाटीवर गाठत त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अजय शिंदे हा खाली कोसळला. त्याचा साथीदार आकाशवरही हल्ला केला. तो थोडा बाजूला जाऊन पडला.

हल्लेखोरांनी अजयवर एका पाठोपाठ एक सपासप वार करायला सुरुवात केली. डोक्यात, हातावर, पाठीवर सपासप वार झाल्याने तो जागीच ठार झाला. अजय गतप्राण झाल्यानंतरही हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. हल्लेखोर एका चारचाकी गाडीतून आले होते. ती गाडी घटनास्थळी ठेवूनच हल्लेखोरांनी पळ काढला. शेकडो लोकांच्या समोर घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.

खुनाची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर आदींसह अधिकारी दाखल झाले.

सीपीआरमध्ये गर्दी; पोलिस छावणीचे स्वरूप

रंकाळा टॉवरवर खून झाल्याची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे जमलेल्या गर्दीला हटविले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सीपीआरला पाठविला. दरम्यानच्या काळात अजयच्या खुनाची बातमी यादवनगरात पोहचली. तेथून त्याचे नातेवाईक, मित्र व महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आरडाओरडा सुरू केला. यावेळी पोलिस अधिकारी दिलीप पोवार, अजय सिंदकर यांनी जमावाची समजूत काढली. संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर जमाव नियंत्रणात आला.

मृत अजय शिंदेवर 16 गुन्हे दाखल

यादवनगरातील अजय शिंदे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावरही मारामारीसह अन्य काही गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले की, या सराईत गुन्हेगाराच्या हद्दपारीचाही प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठविला आहे.

यादवनगरातील पुन्हा गँगवार

यादवनगरातील अनेक गुन्हेगारांचे गट आहेत. यामध्ये वारंवार संघर्ष उद्भवत आहेत. सततच्या या प्रकारामुळे अनेक तरुण मुले या गटा-गटात विभागली आहेत. त्यामुळे सतत संघर्ष होतो. त्यामुळे पोलिसांसमोर येथील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आहे. अजय शिंदेच्या खुनामुळे पुन्हा हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

अजय शिंदे सराईत गुन्हेगार; 16 हून अधिक गुन्हे दाखल

अजय शिंदे हा पोलिस रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 16 हून अधिक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठविला होता.

Back to top button