खा. धैर्यशील माने तातडीने मुंबईला, मुख्यमंत्र्यांशी चर्चा; उमेदवारीबाबत तर्कवितर्क | पुढारी

खा. धैर्यशील माने तातडीने मुंबईला, मुख्यमंत्र्यांशी चर्चा; उमेदवारीबाबत तर्कवितर्क

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महायुती व महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होत असतानाच हातकणंगलेचे शिवसेना शिंदे गटाचे खा. धैर्यशील माने तातडीने मुंबईला गेले आहेत. बुधवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली; मात्र शिंदे गटाने अद्याप कोणत्याही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. माने तातडीने मुंबईला गेल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोघांनीही आपल्या उमेदवारीबाबत ठाम असल्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिल्याचे सांगितले आहे. मंडलिक यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार सुरू केला आहे. खा. माने मुख्यमंत्र्यांकडील बैठकीनंतर कोल्हापुरात परतले होते; मात्र बुधवारी अचानक मुख्यमंत्र्यांकडून निरोप आल्यामुळे मुंबईला गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी रात्री माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. हातकणंगले, नाशिक, यवतमाळ-वाशिम मतदारसंघांतील उमेदवारांबाबत ही बैठक होती. बैठकीला नाशिकचे खा. हेमंत गोडसे, यवतमाळच्या खा. भावना गवळी व यवतमाळमधून ज्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे, ते मंत्री संजय राठोड उपस्थित होते.

Back to top button