महायुतीच्या उमेदवारीचा आजचा वायदा | पुढारी

महायुतीच्या उमेदवारीचा आजचा वायदा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील शिंदे शिवसेना म्हणजेच महायुतीचे उमेदवार गुरुवारी (दि. 28) जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांनी तसा वायदा केला आहे. कोल्हापुरातून संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांनी आपल्याला उमेदवारी मिळाली असून, आपल्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचा दावा यापूर्वीच केला आहे.

महायुतीच्या नेत्यांनी गुरुवारी (दि. 28) उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे गुरुवारी या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी हातकणंगले येथून शौमिका महाडिक यांना भाजप उमेदवारी देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे महाडिक कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

मानेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

बुधवारी रात्री धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. उमेदवारीबाबत ही चर्चा झाल्याचे समजते.

Back to top button