कोल्हापूर : महायुतीचा तिढा कायम; महाविकास आघाडीकडून शाहू महाराज प्रचारात | पुढारी

कोल्हापूर : महायुतीचा तिढा कायम; महाविकास आघाडीकडून शाहू महाराज प्रचारात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा ; लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण हे रविवारीही स्पष्ट होऊ शकले नाही. महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांची यादी सोमवारी (18 मार्च) जाहीर होण्याची शक्यता असून शिवसेना शिंदे गटासह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव निश्चित असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात आणि शहर परिसरातही त्यांनी प्रमुख लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे.

महायुतीच्या उमदेवारीचा पेच कायम असल्याने विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे प्रा. संजय मंडलिक यांच्यासह इतर सर्वच उमेदवार पक्षाच्या आदेशाची वाट पाहात आहेत. उमेदवारीची घोषणा झाली की आम्हीही कामाला लागू, असे त्यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. आचारसंहिता सुरू झाली आहे. महायुतीच्या इतर ठिकाणच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. परंतु जिल्ह्यातील कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाने या उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे; तर भारतीय जनता पक्षाला या दोन्ही जागांविषयी कोणतीही जोखीम नको असल्याने त्यांनी पर्यायी नावांची चाचपणी सुरू केली आहे. अद्यापही उमेदवारीचा हा तिढा संपलेला नाही. विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी रविवारी सकाळी जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घरीच राहणे पसंत केले.

महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ते काँग्रेस पक्षाकडून लढणार असे निश्चित मानले जात आहे. त्यादृष्टीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. रविवारी त्यांनी करवीर तालुक्यासह शहरातील विवाह समारंभांना हजेरी लावली. सायंकाळी त्यांनी कोअर कमिटीची बैठक घेऊन प्रचार यंत्रणा कशा पद्धतीन राबवायची, याबाबत चर्चा केली. सायंकाळी विविध संघटना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाहू महाराज यांची भेट घेऊन राबवत असलेल्या प्रचाराची माहिती दिली.
प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणे, प्रमुख लोकांच्या भेटीगाठी घेणे या माध्यमातून त्यांनी आपला संपर्क सुरू ठेवला आहे. त्यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेते यांनी देखील आपापल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे. संभाजीराजे, मालोजीराजे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराबाबत मार्गदर्शन करून संपर्क मोहीम गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले गेल्याने प्रचारास सुरुवात झाली आहे.

Back to top button