कोल्हापूर : सीपीआर ब्लड बँकेत रक्ताची टंचाई | पुढारी

कोल्हापूर : सीपीआर ब्लड बँकेत रक्ताची टंचाई

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि लगतच्या कर्नाटकातील गोरगरीब, मध्यमवर्गीय रुग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) ब्लड बँकेत रक्ताची टंचाई निर्माण झाल्याने कोरडी पडू लागली आहे. रखरखत्या उन्हामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत. सामाजिक संस्था, महाविद्यालये, दानशूर व्यक्ती, पदाधिकारी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.

सीपीआरमध्ये दररोज 1500 तर महिन्याला 35 ते 40 हजार रुग्णांवर उपचार केले जातात.अतीगंभीर रुग्णांना व काही विभागातील नियमित रुग्णांना रक्तपुरवठा करावा लागतो. हृदय शस्त्रक्रिया, डायलेसिस, थॅलेसेमिया, हिमोफॅलिया, जेबीसिंन्ड्रोम, कॅन्सर, प्रसूतीगृहात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सातत्याने रक्ताची गरज भासत असते. एका रक्ताच्या बॅगेत 350 मिलीलिटर रक्त असते. अशा 1200 ते 2000 रक्त बॅग्जची गरज दर महिन्याला असते. सीपीआरमधील रुग्णांना सीपीआर ब्लड बँकेतून रक्त पुरवले जाते. खासगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण रक्ताची मागणी करतात, पण मुबलक रक्त पिशव्यांची उपलब्धता असेल तरच मिळते.

खासगी ब्लडबँकांकडून प्रलोभने…

खासगी ब्लडबँकांकडून व्यावसायिक पद्धतीने काम केले जाते. रक्तदान शिबिरासाठी प्रलोभने दिली जातात. काही ब्लडबँका तर रुग्णसेवेतील तत्त्वे, मूल्ये गुंडाळून रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. त्याचा फटका सीपीआरच्या ब्लड बँकेला बसला आहे. खासगी ब्लडबँका रक्ताच्या थैलीसाठी रुग्णांकडून आव्वाच्या सव्वा आकारणी करतात.

Back to top button