Kolhapur News: धामणी खोऱ्यात गव्याच्या दिमतीला बिबट्याची साथ; लोकांचा उडतोय भीतीने थरकाप | पुढारी

Kolhapur News: धामणी खोऱ्यात गव्याच्या दिमतीला बिबट्याची साथ; लोकांचा उडतोय भीतीने थरकाप

दिगंबर सुतार

म्हासुर्ली: एरवी जंगलभागातच दिसणारा गवा गावांशेजारी शेतशिवारांत येत तो हल्ली लोकांचा पाहुणा झाला आहे. त्यातच शेतातील उभ्या पिकांत धुडगुस घालत तो शेतीच्या मुळावरच बसला आहे. नुकसान परवडले पण त्याचा जीविताशी खेळ नको, म्हणून येथील शेतकरी दबकतच शेतात जाऊ लागला आहे. मागील काही वर्षे गव्यांच्या दहशतीत भीतीच्या छायेखाली असणाऱ्या धामणी खोऱ्यात लोकांना नुकतेच बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे लोकांसमोरील भीतीचा अंधार अधिकच गडद झालेला दिसून येत आहे. Kolhapur News

राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा या तीन तालुक्यांत विस्तारलेला धामणी खोरे परिसर हा बहुतांश जंगलव्याप्त आहे. अगदी दाजीपूर अभयारण्याशी संलग्न असल्याने वन्यप्राण्यांचा वावर तितकाच आहे. गवे, सांबर, भेकर याबरोबर काही तत्सम प्राण्यांचा अधिवास म्हणून येथील जंगल ओळखले जाते. मात्र, जंगलक्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे तर वणव्यांसारख्या प्रकारांनी त्यांच्या सुरक्षित अधिवासावर परिणाम झाला आहे. कधी काळी नदीभागात दुर्मिळ पणे दृष्टीस पडणाऱ्या या प्राण्यांचा सध्या अधिक वावर वाढला आहे. यापैकी गव्यांचे कळपच्या कळप शेतशिवारांत ठाण मांडत असल्याने लोकांची चिंता वाढली आहे. पिकांना उपद्रवाबरोबरच यापूर्वी लोकांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेतात वावरताना शेतकरी अधिकची सावधानता बाळगत आहे. Kolhapur News

जिल्ह्यात इतरत्र बिबट्याच्या हल्ल्याने झालेल्या दुर्घटना ताज्या असतानाच चार दिवसांपूर्वी जरगी येथील काही शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून झालेला हल्ल्याने परिसरातील त्याच्या अस्तित्वाची चाहूल करून दिली आहे. त्यामुळे लोकांत अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळातच येथील शेती ही डोंगरपायथ्याशी असल्याने वानर, माकडे, गवे यांपासून शेतीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यातच हिंस्त्र श्वापद असणाऱ्या बिबटयाच्या वावराने लोकांना स्वतःची सुरक्षा राखण्यासाठी अधिकची सावधानता बाळगावी लागत आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत लोकांकडून मागणी होत आहे. बिबट्या पकडणे, त्याला जेरबंद करुन अन्यत्र सोडून देणे, हे पर्याय असले तरी परिसर हा राखीव जंगलाचाच असल्या कारणाने वनविभागा समोरही मर्यादा आहेत.

हेही वाचा 

Back to top button