कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता पत्रकातील अंतरात येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीने शासकीय दफ्तरात परस्पर बेकायदेशीरपणे केलेल्या खाडाखोडप्रकरणी आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने तीन पत्रे पाठवूनदेखील अद्याप पंचायत समितीने त्याची दखल न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार पंचायत समितीने केल्यामुळे जिल्हा परिषदेत तो चर्चेचा विषय आहे.
येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील दफ्तरातील खाडाखोडप्रकरणी आतापर्यंत तीन पत्रे पाठवून तक्रारीवर कार्यवाही करून अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, त्याची गडहिंग्लज पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी दखलच घेतली नाही. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्यामुळे जिल्हा परिषदेचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे बोलले जाते.