कोल्हापुरात शाहू महाराज विरूद्ध मंडलिक | पुढारी

कोल्हापुरात शाहू महाराज विरूद्ध मंडलिक

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : कोल्हापुरात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांची केवळ घोषणाच बाकी आहे. उमेदवारांच्या नावावर नेत्यांनी शिक्कामोर्तब केले असून, महाविकास आघाडीकडून शाहू महाराज व महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. आता अन्य जागांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल.

कोल्हापुरातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या संजय मंडलिक यांनी राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र, शाहू महाराज यांचे नाव महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुढे आल्यानंतर पक्ष निवडण्याबाबत महाराज जो निर्णय घेतील, तो मान्य करावा, असे ठरले त्यानुसार शाहू महाराज आता काँग्रेसच्या चिन्हावर लढतील, असे स्पष्ट झाले आहे. तर कोल्हापुरातून महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले असून, स्वत: मंडलिक यांनीच तसा दावा केला आहे. कोल्हापुरात लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर या मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. तर कागल, चंदगड व राधानगरीचे आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीवर बलाबल समसमान आहे.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर व अरुण लाड या आमदारांची ताकद शाहू महाराज यांच्यामागे असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आदींची ताकद असेल.

2019 च्या निवडणुकीत आघाडी धर्म बाजूला ठेवून सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना मदत केली होती. आता ती परिस्थिती नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, शाहू सहकार समूहाचे समरजित घाटगे यांचा समावेश आहे. त्याशिवाय कोल्हापूर उत्तरमधून राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, करवीरचे माजी आमदार व कुंभी-कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके, बि—द्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, अजित पवार गटाचे ए. वाय. पाटील यांची ताकद मंडलिक यांच्यामागे असेल. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व राजवर्धन निंबाळकर, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांची ताकद असेल.

शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत मंडलिक यांना झाली होती. 2019 च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी -भुदरगड, कागल व चंदगड या सहाही मतदारसंघांत मंडलिक यांना मताधिक्य मिळाले होते. मात्र, आता गेल्यावेळी मंडलिक यांना काँग्रेस व राष्ट्रवादीतून जी मदत झाली होती ती आता होणार नाही. मात्र, राष्ट्रवादीचे दोन आमदार हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे त्यांच्यासोबत महायुतीत आहेत.

Back to top button