कोल्हापूर : वाशीची बिरदेव यात्रा उद्यापासून | पुढारी

कोल्हापूर : वाशीची बिरदेव यात्रा उद्यापासून

वाशी; के. एस. रानगे : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान वाशीचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र बिरदेव देवस्थानची त्रैवार्षिक जळ यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. 11 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये येथे सहा ते सात लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्वागतासाठी वाशीनगरी सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.

वाशी गावामध्ये भाविक, भक्त व छोट्या मोठ्या व्यापार्‍यांची रात्रंदिवस वर्दळ चालू झाली आहे. त्रैवार्षिक जळ यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी चार राज्यांतून भाविक उपस्थिती लावत आहेत. बिरदेव मंदिराचा परिसर लखलखीत विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. यात्रेसाठी सर्व प्रकारची दुकाने, पाळणे, करमणुकीचे स्टॉल वाशीमध्ये दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी, देवस्थानचे प्रमुख मानकरी, धनगर समाज बांधव, तरुण व तालीम मंडळे, विविध सहकारी, सामाजिक संस्था, पदाधिकारी, ग्रामस्थ यात्रा नियोजनात वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहाने मदत करत आहेत. पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन दल यांसह सर्व प्रशासकीय, अधिकारी, कर्मचारी, वाहतूक यंत्रणा, कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर यात्रेची क्रेझ

सोशल मीडियावर बिरदेव भक्तीच्या वातावरणात तरुणाई तल्लीन झाल्याचे दिसत आहे. महिन्याभरापासूनच अनेकांचे व्हॉटस्अ‍ॅप डीपी आणि स्टेटस बिरदेव भक्तिमय गाण्यांनी सजले आहेत. त्यातून जळ यात्रेचा सोहळा यंदा दणक्यात होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत.

Back to top button