कोल्हापूर : शोभेच्या फटाक्यांचा साठा जळून खाक | पुढारी

कोल्हापूर : शोभेच्या फटाक्यांचा साठा जळून खाक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मध्यवर्ती शाहू मिल रोडवरील घराला लागलेल्या भीषण आगीत शोभेच्या फटाक्यांच्या दारूसाठ्यासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी ही दर्घटना घडली. सुदैवाने तिघेजण बचावले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तासाभरानंतर आग आटोक्यात आली. आगीत चार लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

फटाक्यांचा मोठा स्फोट झाल्यानंतर परिसरातील नागरिक सतर्क झाले. अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. कर्मचार्‍यांसह परिसरातील नागरिकांच्या मदतकार्यामुळे भडकलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यात संसारोपयोगी साहित्य मात्र बेचिराख झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

दारूसाठ्यासह संसारोपयोगी साहित्य खाक

इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक महेश तेवरे यांचे बागल चौक परिसरात घर आहे. घरात व्यावसायिक साहित्यासह शोभेच्या दारूचा स्टॉक होता. शनिवारी सायंकाळी एका खोलीतील साहित्याला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला. साहित्यासह दारूसाठा असलेल्या खोलीत आग पसरली. फटाकेसाठ्याचे एकापाठोपाठ स्फोट होऊन आगीने रौद्र रूप धारण केले.

मुली, महिला घरातून बाहेर पडल्याने अनर्थ टळला!

अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे घरातील मुली व महिला भयभीत होऊन घरातून बाहेर पडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुख्य रस्त्यासह गल्लीतून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणल्याने तेवरे कुटुंबीयांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तेवरे यांच्या घराशेजारी फटाके विक्रीची आणखी काही दुकाने होती. आगीच्या भडक्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांत भीतीचे सावट होते. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

आगीचे कारण अस्पष्ट

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. घरावर टाकलेले प्लास्टिकचे कागद, नारळाच्या झावळ्या तसेच साहित्यामुळे आग भडकल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

Back to top button