कोल्हापूर विमानतळ ‘नव्या टर्मिनस’चे आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन | पुढारी

कोल्हापूर विमानतळ ‘नव्या टर्मिनस’चे आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचे रविवारी (दि. 10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रत्यक्ष विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला कोल्हापूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यांतर्गत विमानतळावर नवीन टर्मिनस इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीला कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसे असे दर्शनी रूप देण्यात आले आहे. यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारी देखणी आणि सुसज्ज अशी इमारत उभारली आहे. या इमारतीत जाणार्‍या (प्रस्थान) प्रवासी कक्षात छत्रपती शिवरायांच्या राजदरबाराचे भव्य असे तैलचित्र प्रवासी दालनात संपूर्ण भिंतीवरच रेखाटण्यात आले आहे.

यासह छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि करवीरच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचीही तैलचित्रे विमानतळावर अत्यंत खुबीने वापरण्यात आली आहेत. या इमारतीत कोल्हापूरच्या वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडणार आहे.

कोल्हापुरात आगमन होणार्‍या प्रवाशांना करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन होणार आहे. बॅग्ज क्लेम रूममध्ये अंबाबाई आणि जोतिबाच्या भव्य प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यासह रंकाळा, पन्हाळा, खिद्रापूरचे मंदिर अशा कोल्हापूरच्या पर्यटनाचे दर्शन घडवणार्‍या भव्य कलाकृतींनी प्रवाशांचे स्वागत होणार आहे.

आधुनिक सुविधांसह सज्ज असलेल्या या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. कोल्हापूर विमानतळावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

विमानतळावर स्क्रीन लावण्यात आली असून, या ठिकाणी सुमारे एक हजार लोकांची बैठक व्यवस्था केली आहे. नवीन टर्मिनसला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. दरम्यान, शनिवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विमानतळास भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचे विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, विमानतळासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. हवाईसेवा विस्तारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. टर्मिनस उद्घाटनाच्या कार्यक्रमास कोल्हापूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कोल्हापूरच्या विकासाच्या वाटचालीतील एका महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन खा. धनंजय महाडिक यांनी केले आहे.

Back to top button