Shaktipeeth Highway : कोल्हापुरातील ६० गावांतून जाणार शक्तिपीठ महामार्ग | पुढारी

Shaktipeeth Highway : कोल्हापुरातील ६० गावांतून जाणार शक्तिपीठ महामार्ग

संतोष बामणे

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने याबाबतचे राजपत्र व अधिसूचना जाहीर केली आहे. हा मार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते दिग्रज (जि. वर्धा) असा 802 किलोमीटरचा आहे. हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील 60 गावांतून 126 किलोमीटर जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील 19 गावांसह 12 जिल्ह्यांतील 12 हजार 589 गट नंबरमधील शेतीतून हा मार्ग जाणार आहे.

राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रे जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येत आहे. राज्य सरकारने हिंदुहृदयसम—ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिकस्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी व पर्यटनाच्या द़ृष्टीने एक वर्षापासून शक्तिपीठ महामार्ग उभारणीसाठी तयारी केली होती.

याची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणीचा अभ्यास केला आहे.

सर्व मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राजपत्र व अधिसूचना जाहीर केली आहे. अधिसूचनेत जिल्हा, तालुका व गावातील गट नंबर नमूद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले भाग 1, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त नियम व आदेश देण्यात आले आहेत. अधिसूचनेत 618 पानावर सर्व महामार्गात येणार्‍या सर्व गावांतील गट नंबरची माहिती देण्यात आली आहे. सध्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असली, तरी अनेक गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे.

हा महामार्ग सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ व वर्धा अशा 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. यात हजारो शेतकर्‍यांची जमीन जाणार आहे.

Back to top button