कोल्हापूर : कुस्तीचा इतिहास कॅलेंडरवर एकवटला ! | पुढारी

कोल्हापूर : कुस्तीचा इतिहास कॅलेंडरवर एकवटला !

कोल्हापूर : शिवछत्रपतींनंतर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे राजाश्रय, प्रोत्साहन, पाठबळ कुस्ती खेळाला मिळाले. यामुळे कोल्हापूरची कुस्ती अल्पावधीत जगप्रसिद्ध झाली. यामुळे देश-विदेशातील अनेक नामवंत पैलवान कोल्हापूरच्या तालमींमध्ये आश्रयाला आले. पीळदार शरीरयष्टीच्या भारदस्त पैलवानांनी तांबड्या मातीची मैदाने व कुस्तीप्रेमींची मने जिंकली. अशा स्फूर्ती-प्रेरणादायी कुस्तीचा इतिहास कॅलेंडरवर एकवटण्याचा अनोखा प्रयोग कुस्ती संघटक पै. बाबा महाडिक यांनी केला आहे. खासबागमध्ये 9 मार्चला हे प्रदर्शन आयोजित केेले आहे.

भारतीय कुस्तीचा सुवर्णकाळ म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा कालखंड मानला जातो. किंबहूना कुस्तीसह विविध खेळांना प्रोत्साहन व पाठबळ देत क्रीडानगरी कोल्हापूरचा भक्कम पाया त्यांनी निर्माण केला. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापुरातील पेठा-पेठांत तालीम संस्था निर्माण झाल्या. तालमींच्या आखाड्यात शेकडो आबालवृद्ध कुस्ती व व्यायामासाठी एकत्रित आले. देश-विदेशातील मल्लांच्या लढती खासबाग कुस्ती मैदानात सुरू झाल्या.

कुस्तीचा हा इतिहास कॅलेंडरच्या एका पानावर एकवटण्याचे महत्त्वपूर्ण काम पै. बाबा महाडिक यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले आहे. कोल्हापूर, शिराळा, सांगली, पट्टणकोडोली, हिडकल, लाहोर येथील नामवंत पैलवान व वस्तादांची दुर्मीळ छायाचित्रे यातून पाहायला मिळणार आहेत. यात देवाप्पा धनगर, नारायण कसबेकर-जाधव, बाबूमिया, जगज्जेता गामा, इमामबक्ष, खलिपा गुलाम मोहिदीन, गणू गायकवाड, गणपत शिंदे, ज्ञानू माने, तुकाराम कसबेकर-जाधव (पठाण वस्ताद), गोविंद कसबेकर-जाधव, पांडू शिराळे, व्यंकाप्पा बुरुड (काळा पहाड), शिवाप्पा बेरड, कृष्णा भालेकर (मर्दाने), दिनकर शिंदे (ऑलिम्पिकपटू), वस्ताद रावजी सांगावकर यांचा समावेश आहे. छायाचित्रांसह या पैलवानांसंदर्भातील आठवणीही या कॅलेंडरमध्ये छापण्यात आल्या आहेत. कुस्ती परंपरेच्या जतन, संवर्धन व संरक्षणासाठी या कॅलेंडरचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.

Back to top button