कोल्हापूर : महामार्ग नव्हे… साक्षात मृत्यूचा सापळा! | पुढारी

कोल्हापूर : महामार्ग नव्हे... साक्षात मृत्यूचा सापळा!

कोल्हापूर : चालकांची बेफिकिरी, वाहतूक नियमांच्या बेधडक उल्लंघनासह मद्यधुंद अवस्थेत चालणार्‍या स्टंटबाजांमुळे पुणे-बंगळूर महामार्ग तसेच शहरांतर्गत वाहतूक धोकादायक व जीवावर उठणारी ठरत आहे. शंभरावर ब्लॅक स्पॉटमुळे पुणे-बंगळूर महामार्ग म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा बनत आहे. कोल्हापूर,सांगलीसह परिक्षेत्रांतर्गंत पाचही जिल्ह्यात 2022 मध्ये 2775 तर 2023 मध्ये 2909 असे एकूण 5 हजार 679 जणांचे बळी गेले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 838 व सांगली जिल्ह्यात 750 जणांना कायमची किंमत मोजावी लागली आहे.

पहाटेला डोळ्यांवर झापड…

पुणे-बंगळूर महामार्ग अलीकडच्या काळात लांब प ल्ल्याच्या वाहतुकीला सुलभ आणि सोयीचा ठरला असला तरी चालकांची बेफिकिरी आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे धोकादायक ठरत आहे. वाहनांचा भरधाव वेग, त्यात चालकांचे नियंत्रण सुटणे, यापेक्षाही महत्त्वाचे लांब पल्ल्याच्या प्रवासानंतर चालकांच्या डोळ्यावर येणारी झापड… ही कारणे प्रामुख्याने अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

महामार्गावर भीषण अपघातात सव्वाखंडे, शिरोटे कुटुंब उद्ध्वस्त!

पुणे-बंगळूर महामार्गावर गतवर्षी सातारा व पुण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील सव्वाखंडे व कोथळी (ता. शिरोळ) येथील शिरोटे कुटुंब उद्ध्वस्त झाले. सव्वाखंडे कुटुंबातील तरुणी डॉक्टर श्वेता (वय 32) हिच्यासह चौघांचे तर शिरोटे कुटुंबीयातील पाचजणांचे यावेळी बळी गेले!

कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट

पुणे-बंगळूर महामार्ग : घुणकी, किणी टोल नाका, वाठार,अंबप फाटा, टोप ते संभापूर फाटा, पंचगंगा पूल ते सांगली फाटा, उजळाईवाडी उड्डाणपूल, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी फाटा, लक्ष्मी टेकडी, कागल हे ब्लॅक स्पाट जीवघेणे ठरत आहेत. 2023 मध्ये जिल्ह्यात 1275 अपघाती घटनांमध्ये 425 जण ठार झाले आहेत.

अपघातात जायबंदी झालेल्यांची संख्या अगणित!

पुणे-बंगळूर व रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दोन वर्षांच्या काळात प्राणघातक अपघातांच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंता वाढविणारी आहे. कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत 2022 व 2023 मध्ये अपघातात एकूण 5 हजार 679 जणांचे बळी गेले आहेत. जिल्हावार आकडेवारी पुढीलप्रमाणे – त्यात कंसातील आकडे 2023 मधील आहेत : कोल्हापूर 443 (425), सांगली 400 (350), सातारा 495 (486), सोलापूर ग्रामीण 582 (659), पुणे ग्रामीण 851 (989) याशिवाय जायबंदी झालेल्यांची संख्या मृतांपेक्षा कितीतरी पटीत आहे.

साडेपाच हजार तळीराम चालकांवर कायद्याचा बडगा

महामार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्टंटबाजांसह मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन पळविण्याची फॅशनच झाली आहे आणि हीच मंडळी जीवघेण्या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा निष्कर्ष आहे. 2023 मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत कोल्हापूर परिक्षेत्रात 5 हजार 468 मद्यपी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यात कोल्हापूरमधील 369, सांगली 81, सातारा 817, सोलापूर ग्रामीण 651 पुणे ग्रामीणमधील 3550 तळीरामांचा समावेश आहे.

Back to top button