ड्रग्ज तस्करीचे कोल्हापूर कनेक्शन! | पुढारी

ड्रग्ज तस्करीचे कोल्हापूर कनेक्शन!

कोल्हापूर : दिलीप भिसे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळ्यांचा मुंबई-पुण्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांत तस्करांनी धुमाकूळ घातला असतानाही स्थानिक तपास यंत्रणा सुस्त आहे. राजकीय अस्थिरता आणि व्हाईट कॉलर गुन्हेगारीमुळे ड्रग्ज तस्कर शहरासह ग्रामीण भागात चौखूर उधळू लागले आहेत. ड्रग्जची वाढती व्यसनाधीनता भविष्यात धोक्याची घंटा बनू लागली आहे.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणवरही साम्राज्य

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टी व सीमाभागात स्थानिक एजंट, गुन्हेगारी टोळ्यांतील सराईतांना कमिशनचे आमिष दाखवून तस्करीच्या जाळ्यात ओढले आहे. कोरोनानंतर त्यात वाढ होत राहिली. विविध पथकांनी जानेवारी 2023 ते 24 फेब—ुवारी, 2024 काळात मुंबई-पुण्यासह कुपवाड व कोकण किनारपट्टीत छापे टाकून अडीच हजार कोटींचा ड्रग्जसाठा हस्तगत करून तस्करांनाही बेड्या ठोकल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात उघडपणे तस्करी सुरू असल्याचे चित्र आहे.

उपनगरांसह महामार्गावर तस्करांचा धुमाकूळ

झटपट व मुबलक कमाई देणार्‍या ड्रग्ज तस्करीत परप्रांतीय तस्करी टोळ्यांसह स्थानिक बेरोजगार तरुणही मोठ्या प्रमाणात गुरफटत आहेत. माफिया टोळ्यांकडून मिळणारी रसद व व्हाईट कॉलर गुन्हेगारी टोळ्यांच्या आश्रयातून ड्रग्ज तस्करीचा धंदा फोफावू लागला आहे. कोल्हापूर शहरातील जवाहरनगर, राजेंद्रनगर, शेंडापार्क, तावडे हॉटेल, उजळाईवाडी उड्डाणपूल परिसर, गोकुळ शिरगाव परिसरात सायंकाळनंतर ड्रग्ज तस्करांची गर्दी असते.

कोल्हापूर शहरात निर्जन ठिकाणी रात्री झुंबड

सीमाभागातील ड्रग्ज तस्करी टोळ्यांनी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत खोलवर पाळेमुळे रुजवली आहेत. स्थानिक गुन्हेगारी टोळ्या व हप्तेबाजीला सोकावलेल्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून त्यांचा तस्करीचा बिनभोबट धंदा सुरू आहे. कोल्हापूर शहरात निर्जन ठिकाणी रोज सायंकाळी शौकिनांसह तस्करांची झुंबड उडालेली असते. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात तरुणाईला जीवघेणी ठरणारा अमली पदार्थाचा साठा येतो कोठून, याचा आजवर तपास यंत्रणांना छडा लागलेला नाही, हे विशेष होय !

परप्रांतीय ड्रग्ज माफिया कोल्हापूर, सांगलीत आश्रयाला!

पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाड येथील अड्ड्यांवर छापा टाकून सुमारे 300 कोटींचा 140 किलो ड्रग्ज साठा हस्तगत केल्याने प्रशासन यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. कुख्यात ड्रग्ज तस्करांचा पोलखोल होण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात परप्रांतीय सराईत टोळ्यांचा वावर वाढल्याने तस्करीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढलेला दिसून येत आहे.

कोकेन, चरस, गांजा, मेफेड्रोनची खुलेआम विक्री

एनसीबी, सीमा शुल्क, अमली पदार्थविरोधी पथकांसह मुंबई व पुण्यातील स्थानिक पोलिस यंत्रणांनी अमली पदार्थविरोधी व्यापक मोहीम सुरू करूनही कोकेन, चरस,गांजा आणि मेफेड्रोनची बेधडक तस्करी होत आहे. मुंबई पोलिसांनी 2022 व 2023 मध्ये 25 कोटींपेक्षा जादा किमतीचा अमली साठा जप्त करून 125 जणांना बेड्या ठोकल्या. पुण्यातही पंधरवड्यात 2200 कोटींचा 1100 किलो ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथून 300 कोटींचे ड्रग्ज जप्त करून तस्करांना बेड्या ठोकल्या.

Back to top button