राज्यात १५ मोठी धरणे कोरडीठाक! केवळ ४०.८८ टक्के साठा शिल्लक | पुढारी

राज्यात १५ मोठी धरणे कोरडीठाक! केवळ ४०.८८ टक्के साठा शिल्लक

सुनील कदम

कोल्हापूर :  राज्यातील मोठ्या धरणांपैकी उजनीसह पंधरा मोठी धरणे कोरडीठाक पडली आहेत. 80 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून केवळ 40.88 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात यंदा पाणीबाणी अवतरल्याची ही स्पष्ट चिन्हे आहेत.

राज्याच्या बहुतांश भागांत यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. अनेक धरणांमध्ये जेमतेम किंवा अत्यंत कमी पाणीसाठा झाला आहे. राज्यात मोठी, मध्यम आणि लहान आकाराची एकूण 2,994 धरणे आहेत. या सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता 1,703 टीएमसी इतकी आहे. मात्र, आजघडीला या सर्व धरणांमध्ये मिळून 696 टीएमसी (40.88 टक्के) पाणीसाठा
शिल्लक राहिला आहे. निम्मा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने आणि जवळपास निम्मा-अर्धा जून असे चार महिने राज्याला या एवढ्याशा पाण्यावर गुजराण करावी लागणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता, अनेक भागांतून होत असलेली पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची मागणी, या बाबी विचारात घेता यंदा राज्याच्या बहुतांश भागांच्या घशाला कोरड पडण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. येत्या काही दिवसांत तर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोयना, जायकवडी, उजनीसह एकूण 138 मोठी धरणे आहेत. एकूण 1,703 टीएमसी पाणी साठवण क्षमतेपैकी 1,255 टीएमसी इतकी क्षमता या मोठ्या धरणांची आहे. राज्याची पाण्याच्या बाबतीतील बहुतांश मागणी या मोठ्या धरणांवरच अवलंबून आहे. मात्र, या मोठ्या धरणांपैकी उजनीसह पंधरा धरणे आजघडीला कोरडीठाक पडली आहेत. अन्य 80 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे, तर बाकीच्या 43 मोठ्या धरणांमध्येही जेमतेमच पाणीसाठा आहे. मात्र, या बहुतांश धरणांच्या लाभक्षेत्रातून दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढू लागली आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती मागणी, याची सांगड घालता घालता प्रशासनाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्यात सर्वाधिक बिकट अवस्था नेहमीप्रमाणे यंदाही मराठवाड्याचीच झाली आहे.

मराठवाड्यात टंचाईच्या झळा

मराठवाड्यात सर्वप्रकारची मिळून एकूण 920 धरणे असून, त्यांची पाणी साठवण क्षमता 321 टीएमसी आहे. मात्र, आजघडीला मराठवाड्यातील एकूण पाणीसाठा केवळ 67.5 टीएमसी (21 टक्के) इतकाच राहिलेला आहे. आगामी चार महिने मराठवाडा पाणीबाणीच्या झळांनी होरपळून निघण्याची ही स्पष्ट चिन्हे आहेत. पुणे विभागाची पाणी साठवण क्षमता राज्यात सर्वाधिक म्हणजे 647 टीएमसी आहे; पण यंदा पुणे विभागात केवळ 270 टीएमसी (41 टक्के) एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागाची अवस्थाही अशीच आहे. नागपूर, अमरावती आणि कोकण विभागाची अवस्था थोडी बरी दिसत असली, तरी उन्हाळ्याच्या अंतिम पर्वात या विभागांनाही पाणीबाणीच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रादेशिक संघर्षाची चिन्हे

महाराष्ट्राची एकूण वार्षिक पाणी उपलब्धता ही 4,973 टीएमसी इतकी आहे. मात्र, राज्याच्या बहुतांश भागांत यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. राज्यात 2,137 टीएमसी पाणी हे राज्यातील छोटे-मोठे तलाव, लघू पाटबंधारे तलाव, पाझर तलाव आणि प्रामुख्याने राज्यातील नद्यांच्या पात्रातून उपलब्ध होते. मात्र, पावसाअभावी तिथेही जवळपास 30 टक्के पाण्याची कमतरता जाणवत आहे. राज्यात वर्षाकाठी तब्बल 753 टीएमसी इतके पाणी भूगर्भातून उपसले जाते. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे भूगर्भातील पाण्याची उपलब्धताही साधारणत: 30 टक्के कमी होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. या सगळ्या बाबी विचारात घेता यंदा राज्यात किमान 1,500 टीएमसी पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे. साहजिकच, येत्या काही दिवसांमध्ये पाण्यासाठी प्रादेशिक संघर्ष उफाळल्यास नवल वाटू नये.

Back to top button