मौखिक आरोग्‍य दिन विशेष : हार्मोन्समधील बदल महिलांच्या मौखिक आरोग्‍यावर करतो ‘हा’ परिणाम; वाचा सविस्‍तर… | पुढारी

मौखिक आरोग्‍य दिन विशेष : हार्मोन्समधील बदल महिलांच्या मौखिक आरोग्‍यावर करतो 'हा' परिणाम; वाचा सविस्‍तर...

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बालपण ते वृद्धापकाळ आयुष्यांच्या या टप्प्यावर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीराच्या सामान्य कार्यात हार्मोन्सच्या चढउतारामुळे बदल होतात. हे बदल कधी कधी हानीकारकही ठरतात, तर कधी हार्मोन्समधील बदलांमुळे मौखिक आरोग्यावरही परिणाम होतो. सर्वसाधारणपणे किशोरवयीन, मासिक पाळी, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या पाच टप्प्यावर महिलांच्या शरीरात होणार्‍या हार्मोन्स बदलाचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यावर परिणाम जाणवतो.

किशोरावस्था

बालपण सोडून पौगंडावस्थेकडे वाटचाल करताना या सुरुवातीच्या टप्प्यावर मुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या दरम्यान शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, परिणामी हिरड्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे ब—श करताना किंवा गुळण्या करताना हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या उद्भवताना दिसते.

मासिक पाळी

मुली आणि महिलांमध्ये दर महिन्याला येणार्‍या मासिक पाळी दरम्यान प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढत असल्यामुळे हिरड्यांना सूज येण्याची शक्यता असते. या कारणास्वत मासिक पाळीत हिरड्यांना आलेली सूज कधी कधी मासिक पाळीवेळी येते. जी पाळीच्या एक-दोन दिवसांनी आपसूकच बरी होते. याशिवाय लाळग्रंथीतही सूज येणे, फोड येणे अशा समस्या जाणवतात.

गर्भनिरोधक गोळ्या

गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनसारखे हार्मोन्स असतात. ते मौखिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे हिरड्या सुजतात.

गर्भधारणा

गर्भधारणेदरम्यान होणार्‍या हार्मोन्स बदलांमुळे हिरड्यांना सूज येते. ज्यामुळे शरीराची बॅक्टेरियांना होणारी प्रतिक्रिया बदलते. परिणामी दुसर्‍या ते आठव्या महिन्यापर्यंत हिरड्यांना सूज येण्याचा धोका असतो.

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या मौखिक आरोग्यात अनेक बदल होतात. कमी लाळेमुळे तोंड कोरडे होणे, संवेदनशीलता वाढणे, दात कमकुवत होणे अशा अनेक समस्या जाणवतात. हे इस्ट्रोजेनच्या कमी पातळीमुळे घडते. यासह पीसीओएस सारख्या आजारांमुळे मौखिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात सर्वाधिक मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.

अशी घ्या काळजी …

दिवसातून दोन वेळा ब्रश करावा, खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरावी, नियमित गुळण्या कराव्या, गोड पदार्थ सतत खाणे टाळावे, हिरव्या पालेभाज्या, फळे आदींचा आहारात समावेश करावा, भरपूर पाणी प्यावे. महत्त्वाचे म्हणजे दर सहा महिन्यांनी मौखिक तपासणी करून घ्यावी.

Back to top button